पुणे: सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एका मंडळावर गुन्हा दाखल करून साउंड सिस्टिम जप्त केली आहे. लाउड स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप एवढीच परवानगी असताना आठ बेस आणि आठ टॉप असे लाउड स्पीकर या मंडळाने लावले होते.
राहुल प्रकाश जगताप (रा. बिबवेवाडी ओटा, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या अध्यक्षाचे नाव आहे. या वर्षीच्या दहीहंडी मंडळावर गुन्हा दाखल झालेले पहिले मंडळ आहे. याबाबत पोलिस अंमलदार प्रतिक दिलीप करंजे यांनी फिर्याद दिली.
बिबवेवाडी ओटा येथील श्रीकृष्ण मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिस ठाण्याकडून पारंपरिक वाद्य वापरण्यासाठी परवाना घेतला. मात्र, त्यात लाउड स्पीकर वापरण्याबाबतच्या लेखी आदेशाचा भंग करून ८ बेस व ८ टॉप असे लाउड स्पीकर लावून सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण केल्यामुळे नागरिकांना त्रास झाला आहे.
त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक गरड तपास करीत आहेत.दरम्यान, पोलिसांनी सुरुवातीपासूनच ध्वनिप्रदूषणाबाबत कडक भूमिका घेतली आहे.
प्लाझ्मा, मिक्सर ग्रीड तसेच लेझर लाइटला पूर्णपणे बंदी घातली आहे. ध्वनियंत्रणेतील स्पीकरसाठी ४ बेस व ४ टॉप यांना परवानगी दिली आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक लाउड स्पीकर लावून ध्वनिप्रदूषण केल्यास कारवाई करण्यासह साउंड सिस्टिम जप्त करण्यात येईल, असे सांगितले आहे.