

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीत होणाऱ्या अभूतपूर्व गर्दीचा विचार करता महामेट्रोने प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी विशेष नियोजन सुरू केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या अलोट गणेशभक्तांना सुरक्षित आणि जलद सेवा देण्याचा मेट्रोचा प्रयत्न असणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची मोठी गर्दी होते. या काळात रस्तेवाहतुकीवर येणारा ताण लक्षात घेता प्रवाशांना गर्दीच्या त्रासापासून मुक्ती मिळावी आणि त्यांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, यादृष्टीने मेट्रोच्या संचलन फेऱ्या आणि वेळेचे विशेष नियोजन केले जात आहे.
या नियोजनांतर्गत मुख्य गर्दीच्या दिवशी मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढवणे, उशिरापर्यंत सेवा सुरू ठेवणे आणि प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा व तिकीट विक्रीव्यवस्था तैनात करण्यावर भर दिला जाणार आहे. महामेट्रोच्या या पुढाकारामुळे यंदा गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो संचलन, प्रवासी सुरक्षिततेचे विशेष नियोजन सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांसाठी मेट्रोकडून विशेष नियोजन करण्यात येणार आहे. या नियोजनामुळे प्रवाशांना गर्दीच्या त्रासातून मुक्तता होऊन त्यांना सुलभपणे प्रवास करता येईल, या पद्धतीने आम्ही काम करत आहोत.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.