पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाइन कोर्सेस अंनिस सुरू करीत असून, यातील अभ्यासक्रम हे नागरिकांसाठी विनामूल्य असणार आहेत. या लोकविद्यापीठाचे लोकार्पण रविवारी (दि. 16) होणार आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आणि राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक सुहास पळशीकर यांच्या उपस्थितीमध्ये लोकविद्यापीठाचे लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम नवी पेठेतील पत्रकार भवनच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसमार्फत मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात आणि हमीद दाभोलकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
रविवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे लोकार्पण
या लोकविद्यापीठातील अभ्यासक्रमांमुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रशिक्षण घेतलेल्या नागरिकांना भोंदुगिरी ओळखणे आणि स्वत:ची फसवणूक थांबविणे सहजशक्य होणार आहे, असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे कार्यकर्ते सप्रयोग व्याख्यानातून सातत्याने विद्यार्थी आणि इतर नागरिकांसोबत अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतात.
मुलांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे हे सर्वांत प्रभावी असते. परंतु, त्याला मर्यादा असतात. त्यामुळेच अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर ऑनलाइन कोर्सेस अंनिस सुरू करत आहे.
प्रचार-प्रसार होणारे अभ्यासक्रम
राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग म्हणून सहभाग असताना देखील प्रत्यक्षात शैक्षणिक अभ्यासक्रमात त्याचा समावेश केलेला नाही. याच पार्श्वभूमीवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार होणारे अभ्यासक्रम हे नागरिकांना सहज उपलब्ध असावेत, यासाठी लोकविद्यापीठाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम तयार केले आहेत. पुढच्या दुसऱ्या टप्प्यात फलज्योतिष फोलपणा, मानसिक आरोग्य अशा स्वरूपाचे कोर्स देखील सुरू केले जाणार आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
सहा कोर्सेस सुरू करणार
सुरुवातीला वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भामक वास्तुशास्त्र, छद्म विज्ञान, व्यसनमुक्ती हे सहा कोर्सेस सुरू करण्यात येतील.
तेरा वर्षांपुढील नागरिकांना हे कोर्सेस करता येतील. ऑनलाइन परीक्षा
दिल्यानंतर लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे प्रमाणपत्र त्यांना मिळेल.
परीक्षेतील प्रश्न देखील केवळ माहिती नाही तर आकलन तपासणारे आहेत.
www.anisvidya.org.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा विनामूल्य असतील, असेही पत्रकात म्हटले आहे.