

पुणे: लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे संशोधकांचे निरीक्षण आहे. त्यामागे कुपोषण, गर्भावस्थेतील मातांचे अल्प पोषण, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली हे घटक असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकतेच ‘लँसेट’ या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाने या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
केईएम हॉस्पिटल येथील ‘डायबेटिस युनिट’चे प्रमुख डॉ. चित्तरंजन याज्ञिक हे या संशोधनाचे सहलेखक आहेत. या शोधनिबंधात ‘टाईप 5 डायबेटिस’ असा एक नव्या प्रकारचा मधुमेह ओळखण्यात आला आहे. हा प्रकार विशेषतः गरीब, अल्प पोषण झालेल्या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. अशा रुग्णांमध्ये वजन कमी असते, इन्शुलिनची कमतरता आढळते, पण टाईप 1 मधुमेहात आढळणारा किटोसिडॉसिस दिसत नाही.
संशोधनानुसार, गर्भावस्थेत मातेला योग्य पोषण न मिळाल्यास बाळाच्या अवयवांच्या विकासावर परिणाम होतो, ज्यामुळे त्याला पुढील आयुष्यात मधुमेहाचा धोका वाढतो. भारतीय बालकांचे सरासरी जन्म वजन जागतिक स्तरावर कमी असल्याने हा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. रुबी हॉल क्लिनिकमधील मधुमेहतज्ज्ञ डॉ. पियुष लोढा म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण, विशेषतः टाइप 2 मधुमेहाचे, झपाट्याने वाढत आहे आणि हे सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. यामागे जीवनशैलीतील बदल, आनुवंशिक कारणे आणि पर्यावरणीय घटक हे सर्व मिळून जबाबदार आहेत.
आजच्या मुलांमध्ये बसून राहण्याची सवय, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणे आणि बाहेर खेळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे वजन वाढते आणि शरीरात इन्सुलिन विरोधकता (इन्सुलिन रेझिस्टन्स) निर्माण होते. त्याचबरोबर, प्रक्रिया केलेले अन्न, साखरेचे पेय, फास्ट फूड आणि जास्त चरबीचे पदार्थ यांचे सेवन वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी सतत वाढत राहते आणि शरीरातील इन्सुलिन निर्मितीवर ताण येतो.
असंतुलित आहार, वेळेवर न खाणे आणि झोपेची कमतरता यामुळे चयापचयावर (मेटाबॉलिझम) विपरीत परिणाम होतो. शहरी जीवनशैली, मानसिक ताण आणि शारीरिक श्रमाची कमतरता हीसुद्धा लहान वयात मधुमेह वाढविणारी कारणे ठरतात.
पालकांपैकी एखाद्या व्यक्तीस मधुमेह असल्यास मुलांमध्येही त्याची शक्यता वाढते. अनेकदा थकवा, जास्त तहान लागणे किंवा वजनात होणारे बदल यांसारखी लक्षणे दुर्लक्षित केली जातात, ज्यामुळे मधुमेहाचे निदान उशिरा होते. याशिवाय, गर्भावस्थेत आईला झालेला मधुमेह मुलांच्या भविष्यातील मधुमेहाच्या जोखमीला कारणीभूत ठरतो. त्यामुळे लहान मुलांमधील मधुमेहाची वाढती समस्या ही चुकीचा आहार, शारीरिक निष्क्रियता, वाढते वजन आणि आनुवंशिक प्रवृत्ती यांचा एकत्रित परिणाम आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहार, नियमित शारीरिक क्रिया, मर्यादित स्क्रीन टाइम आणि नियमित आरोग्य तपासणी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
डॉ. पीयूष लोढा, मधुमेहतज्ज्ञ, रुबी हॉल क्लिनिक
हवामान बदल, स्थलांतर, दुष्काळ आणि अन्नटंचाई यामुळे कुपोषण पुन्हा वाढू लागल्यास लहान मुलांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. लहानपणीच्या पोषणाची कमतरता आणि नंतरच्या काळातील चुकीची जीवनशैली यामुळे बालवयातही मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत.
डॉ. चित्तरंजन याज्ञिक