भिगवण : सावकारकीच्या हुकूमशाहीला कंटाळून अनेकांना गाव सोडावे लागले, अनेक गोरगरीब कर्जबाजारी झाले. आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे भिगवण व परिसरातील अवैध सावकारकी व भिशी चालकांवर कारवाई करण्याचा मागणीसाठी ग्रामस्थांनी रविवारी (दि. 9) पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.(Latest Pune News)
भिगवण व परिसरास अवैध भिशी व सावकारकीचा मोठा विळखा पडला आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने हा व्यवसाय फोफावत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी रविवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातून हा मोर्चा हायस्कूल मार्गे पोलिस ठाण्यावर जाऊन धडकला. मोर्चाच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
भिगवण व परिसरातील सावकारकी व भिशी मुळे व्यापारी, तरुण, गोरगरीब या विळख्यात सापडली आहेत. यातून कर्जबाजारी होऊन व सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांना गाव सोडावे लागले आहे. काहीजण आत्महत्येच्या मानसिकतेत आहेत. सावकारांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जाणाऱ्यांना संबधित सावकार विनयभंग, छेडछाड, दमदाटी, जिवे मारण्याच्या धमक्या देऊन तक्रार मागे घेण्यास भाग पाडतात असे या निवेदनात म्हटले आहे. सावकार व भिशी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी पाटील यांनी तक्रारी येताच कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. या मोर्चात अजय भिसे, अनिकेत भिसे, कृष्णा भिसे, राजू गाडे पाटील, गणेश वायदंडे, नवनाथ पाटोळे, शंकर मोतीकर, अनिल झेंडे, छाया लांडगे, अनिता लांडगे, ललिता भिसे, सीमा कसबे, दुर्गा शिर्के, आशा लांडगे, पूजा लांडगे, अंकिता लांडगे आदी सहभागी झाले होते.
मोर्चातील महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेणारे ठरले. सावकारांना पाठबळ कोणाचे? सामान्य जनतेच्या पाठीशी कोण? फक्त बघ्याची भूमिका, वाचवणार कोण? बेकायदेशीर सावकरकीचा निषेध, असे फलक हातात घेऊन मोर्चा काढण्यात आला.