

टाकळी हाजी: कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांची संख्या वाढली असून, स्थानिक पातळीवर जनसंपर्क मोहिमा जोमात सुरू झाल्या आहेत. (Latest Pune News)
या गटातून जिल्हा परिषद उमेदवारीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, बाजार समितीचे माजी संचालक सावित्रा थोरात, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे आणि कवठे यमाईचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब डांगे यांची नावे चर्चेत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गावडे आणि डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून घोडे आणि ढोमे, तर भाजपकडून थोरात उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. डॉ. पोकळे यांनी स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय खुला ठेवला असल्याची चर्चा आहे.
या गटाबाहेरील मंगलदास बांदल, देवदत्त निकम आणि दीपक घोलप या नावांचीही उमेदवारीसाठी चर्चा रंगत असली, तरी स्थानिक नागरिक त्यांना फारसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसते. स्थानिक इच्छुक गेल्या काही वर्षांपासून जनसंपर्क मजबूत ठेवत असल्याने बाहेरील उमेदवारांना मैदानात उतरणे कठीण जाणार आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
शिरूर तालुक्याच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावणारे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा यापूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रभाव राहिलेला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी विकासाच्या मुद्द्द्यावर अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत राहणे पसंत केले; मात्र तरीही मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे मताधिक्य मिळाल्याने या वेळीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
एकूणच, या गटात स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार अशी चुरस निर्माण होण्याची शक्यता कमी असून, ही निवडणूक स्थानिक अस्तित्व आणि वर्चस्वाची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.