

नानगाव : पारगाव स. मा. (ता. दौंड) येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने नागरिकांनी आंदोलन केले. त्याची दखल घेत काही गावनेत्यांनी येथे खडी, मुरूम टाकून तात्पुरती सोय केली. आता येथील पाण्याची समस्या संपली, पण धूळ आणि खडीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे पाण्यातून उठून खडी, फुफाट्यात पडल्याची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.(Latest Pune News)
येथे गेल्या सहा महिन्यांपासून पावसाचे पाणी साचत होते. त्याचा वाहनचालक, प्रवासी, ग्राहकांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लगत होता. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी येथील पाण्यात उभे राहून आंदोलन केले. या वेळी जलपूजन करत रस्ता चांगला करण्याची मागणी केली.
या आंदोलनाची मोठी चर्चा झाल्यानंतर गावातील काही नेत्यांनी पुढाकार घेत येथे मुरूम टाकून पाण्याची समस्या तात्पुरती का होईना दूर केली. त्यानंतर ग््राामस्थांनी गावनेत्यांचा सत्कारही केला. मात्र या ठिकाणी मुरमावर रोलर फिरवला गेला नाही. त्यामुळे येथे आता खडी आणि धुळीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी आता पाण्यातून उठून खडी, फुफाट्यात पडल्याचे मिश्किलपणे ते बोलून दाखवत आहेत.
पारगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ होत चालली आहे. येथे परिसरातील गावांसह इतर ठिकाणांहूनही अनेक व्यापारी, ग््रााहक येतात. मात्र येथील मोठ्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आधी पाण्यातून वाट काढावी लागत होती. आता खडी, फुफाटाचा सामना करावा लागतो. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येथील समस्या कधी संपणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आम्ही केलेल्या आंदोलनाचा विचार करत गाव नेत्यांनी आपापल्या परीने तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणचा प्रश्न मिटविला आहे. मात्र या ठिकाणी अजून मुरूम टाकून व रोलर फिरवून या ठिकाणचा रस्ता चांगला करावा लागणार आहे. अन्यथा अपघाताची शक्यता वाढल्याचे येथील विजय चव्हाण, दत्तात्रय आल्हाट, बबलू ताकवणे, सर्जेराव भोसले आदी नागरिकांनी सांगितले.