Girl Missing Case Pudhari
पुणे

Bhigwan Girl Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणाला कलाटणी; तरुणी मध्यरात्री बारामती पोलिस ठाण्यात हजर

डीवायएसपी डॉ. सुदर्शन राठोड यांची माहिती; तरुणीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बहुचर्चित भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणी शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. सध्या ती शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

भरदिवसा आई-भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा गुन्हा भिगवण पोलिसांत दाखल झाला होता. या प्रकरणात जहीर शेख व आयान शेख या दोघा भावांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकऱणामुळे भिगवणमध्ये मोठी खळबळ उडाली होती. हिंदूत्ववादी संघटनांनी आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंद ठेवण्यात आले होते.

दरम्यान या तरुणीचा एक व्हिडीअो समोर आल्यानंतर या घटनेला अचानक कलाटणी मिळाली होती. या व्हिडीअोमध्ये तिने मी स्वतःहून संबंधित तरुणासोबत आल्याचे सांगत माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच माझे गेल्या नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचेही सांगितले होते. तरीही आक्रमक संघटनांनी तिला हजर करा, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे केली होती. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता.

घटनेनंतर हे जोडपे श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड मार्गे महाबळेश्वरला गेले होते. तेथून ते बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले.

संबंधित प्रकरणातील तरुणी सध्या बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचे कुटुंबिय तिला दुपारी भेटणार आहे. आम्ही संबंधित तरुणीचा तसेच तरुणाचाही जबाब नोंदवणार आहोत.
डाॅ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT