भिगवण: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे अनेक भिशीचालकांकडे अडकलेल्या पैशांच्या तणावातून आणखी एकाचा बळी गेला आहे. देणे कमी आणि येणे जास्त असलेष तरी भिशीच्या आर्थिक तणावातून विवाहित युवकाने बारामतीत आपल्या जीवनाचा शेवट केला. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पैसे बुडावणाऱ्या तब्बल 36 जणांची नावे लिहिली आहेत. या घटनेमुळे भिगवणमधील भिशी व सावकारकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भिगवणचे माजी ग््राामपंचायत सदस्य प्रल्हाद काळे यांचा मुलगा शहाजी काळे यांनी बारामतीमध्ये शुक्रवारी (दि. 20) पहाटे आत्महत्या केली आहे. दुपारी भिगवण येथे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यासोबत सुसाईड नोट जोडल्याचीही माहिती आहे. या नोटमध्ये एका पेजवर घरातील आर्थिक व्यवहाराची माहिती व दुसऱ्या पेजवर पैसे बुडवणाऱ्या 36 जणांची नावे लिहिली आहेत. यावरून त्यांनी भिशीच्या तणावातून आत्महत्या केल्याचे जवळच्या मित्र परिवाराने दै.’पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
काळे यांच्या सुसाईड नोटमधल्या पैसे बुडावणाऱ्या व्यक्ती या सर्वाधिक भिगवणमधील आहेत. नावाची व्याप्ती पिंपरी- चिंचवडपर्यंत असून, तक्रारवाडी, खानोटा, डिकसळ आदी गावांतील भिशीचालक व सावकारांच्या नावाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक भिशी व सावकारकीचा सुळसुळाट हा भिगवणमध्ये आहे. येथे आतापर्यंत कित्येकांनी या भिशी व सावकरकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, तर कित्येकांना गाव सोडून पलायन करावे लागले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी भिशीमधील सर्वाधिक मोठ्या घोटाळ्याची चर्चा असून, याची व्याप्ती इतर जिल्ह्यांत पोहचली आहे. भिगवण गाव हे झपाट्याने विकसित झालेले गाव म्हणून पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र, येथील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल ही भिशी व सवकारीतून उगवते व सायंकाळी त्याच व्यवहारातून मावळतेही. यातून अनेक व्यावसायिक हे रसातळाला गेले आहेत. अनेकांचा जीव टांगणीला लागला आहेत.
यातून अनेकदा लहान-मोठ्या घटना घडल्याची उदाहरणे आहेत. मात्र, भिशी चालविणारे व सावकारांचे पोलिसांशी असलेले ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे बहुतांश प्रकाराने दाबली गेल्याची चर्चा आहे. यातून काही भिशीचालकांची मजल थेट जिवाशी खेळण्यापर्यंत गेली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन व पोलिस जागे होतील, असा प्रश्न विचारला जात आहे. आज काळे यांच्या अंत्यविधीत देखील श्रद्धांजली वाहताना याची दाहकता दिसून आली.