

पुणे: शहरातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल 13 प्रकरणांमध्ये सायबर चोरट्यांनी तब्बल 1 कोटी 61 लाख 98 हजार 952 रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. शेअर मार्केट, टास्क फॉड, बनावट लिंक तसेच मनी लाँड्रिंगच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काही मिनिटांमध्ये सायबर चोरटे बँकखाती वेगवेगळ्याआमिषापोटी मोकळी करत आहे. काही जण तर कमवलेली आयुष्याची कमाई सायबर फॉडमध्ये घालवून बसल्याची उदाहरणे आहेत.
आंबेगाव बुद्रुक परिसरातील 35 वर्षीय तरुणीला सायबर चोरट्यांनी लिंक पाठवून 5 लाख 39 हजार 897 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 7 ते 11 जुलैदरम्यान घडला असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वारजे परिसरातील 44 वर्षीय तक्रारदाराला शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून 16 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत घडला असून, वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तिसऱ्या घटनेत कोथरूड परिसरातील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 11 लाख 67 हजार 558 रुपये, तर त्याच परिसरातील 55 वर्षीय महिलेची मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची बतावणी करून 19 लाख 30 हजार रुपये उकळण्यात आले. या दोन्ही प्रकरणांची नोंद कोथरूड पोलिस ठाण्यात केली आहे. चौथ्या घटनेत आनंदनगर, सिंहगड रोड परिसरातील 33 वर्षीय महिलेची वर्क फॉम होमच्या आमिषाने 3 लाख 50 हजार 540 रुपये, तर हिंगणे परिसरातील 49 वर्षीय महिलेची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 11 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
ही दोन्ही प्रकरणे सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल आहेत. धायरी येथील 23 वर्षीय युवकाची हॉटेल रेटिंग आणि ट्रेडिंगच्या आमिषाने 3 लाख 4 हजार 100 रुपये, तर धानोरी येथील 39 वर्षीय तरुणाची स्टॉक ट्रेडिंगच्या नावाखाली 27 लाख 80 हजार 957 रुपयांची फसवणूक झाली आहे. ही प्रकरणे अनुक्रमे नऱ्हे आणि विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी करत असून, नागरिकांनी अनोळखी लिंक, गुंतवणुकीची आमिषे आणि टास्कच्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
फटास्कपूर्तीसह स्टॉक मार्केटिंगचे आमिष भोवले
वानवडी येथील 57 वर्षीय व्यक्तीला युएसडीटी खरेदीच्या नावाखाली 27 लाख 83744 रुपये गमवावे लागले. कोंढव्यातील 55 वर्षीय एकाची टास्क पूर्ण केल्यास परतावा मिळेल, अशी बतावणी करून 10 लाख 86 हजारांची फसवणूक केली. लोहगाव येथील 42 वर्षीय महिलेची टास्कच्या नावाखाली 6 लाख 8900 रुपये, तर वाघोलीतील शिंदे वस्ती येथील 38 वर्षीय व्यक्तीची लिंक पाठवून 5 लाख 61256 रुपयांची फसवणूक केली आहे. वडगाव शेरी परिसरातील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.