Bharat Mandapam Pudhari
पुणे

Pune Bharat Mandapam: लोहगावमध्ये ‘भारत मंडपम’ प्रकल्पाला गती; आरक्षण बदलाचा अहवाल राज्याकडे

19.73 हेक्टर जागेवरील नागरी सुविधांच्या आरक्षणांवरून नागरिकांच्या हरकती; अंतिम निर्णय आता राज्य शासनाकडे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक 236 आणि 238 मधील सुमारे 19.73 हेक्टर जागेवर ‌‘भारत मंडपम‌’ उभारण्याच्या प्रस्तावाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. या जागेवरील पार्किंग, रस्ते, पाण्याची टाकी, रुग्णालय, उद्यान, क्रीडांगण आणि भाजी मार्केट, अशा नागरी सुविधांसाठी असलेल्या आरक्षणांमध्ये बदल करण्याबाबत नागरिकांकडून आलेल्या हरकती व सूचनांवरील सुनावणीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. समिती अध्यक्षा स्मिता वस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्लीतील ‌‘भारत मंडपम‌’च्या धर्तीवर लोहगावमध्ये सांस्कृतिक, कलाविषयक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी मेळावे, संगीत कार्यक्रम आणि विविध उपक्रम आयोजित करता येतील, असा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी संबंधित भूखंडावरील विद्यमान नागरी आरक्षणे उठविण्याची मागणी ‌‘एमब्लम रियल्टी एलएलपी‌’ आणि आमदार सुनील कांबळे यांनी राज्य शासनाकडे केली होती.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेने मुंबई प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम 37 (1) अंतर्गत आरक्षण बदलाची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या. या प्रक्रियेत एकूण 13 नागरिकांनी हरकती नोंदविल्या असून, सुनावणीवेळी त्यापैकी अनेक जण उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि नागरिक सारंग यादवाडकर यांच्यासह काही स्थानिकांनी नागरी सुविधांसाठी असलेल्या आरक्षणांमध्ये बदल करण्याची मागणी स्थानिकांकडून झालेली नसल्याचे सांगितले. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता रुग्णालय, उद्यान आणि क्रीडांगणासारख्या सुविधांची आवश्यकता अधिक असल्याने ही आरक्षणे कायम ठेवावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, या प्रस्तावाशी संबंधित सर्व कागदपत्रे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली.

दरम्यान, सुनावणीदरम्यान प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला होता. समितीने हा प्रस्ताव मंजूर केल्याने या प्रकरणातील पुढील निर्णय आता राज्य शासनाच्या पातळीवर होणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव देणारी एमब्लम रियल्टी एलएलपी ही कंपनी 1 डिसेंबर 2023 रोजी स्थापन झाल्याची नोंद आहे.

प्रकल्प का महत्त्वाचा आहे?

लोहगाव हे पुण्याचे केंद्रस्थान असून, विमानतळाच्या जवळ असल्याने या जागेला विशेष महत्त्व आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळेल. तसेच, आंतरराष्ट्रीय परिषदा, मोठे व्यापार मेळावे आणि अधिवेशनांसाठी शहरात एक हक्काचे आणि भव्य ठिकाण उपलब्ध होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांच्या रांगेत आता पुण्यातही अशा प्रकारच्या भव्य केंद्राची उभारणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT