Pune Crime News Pudhari
पुणे

Baramati Crime: 'आई मला ब्लॅकमेल केलं', बारामतीत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; PSI पिता- तरुणीविरोधात गुन्हा

Baramati Todays News: वडीलांचा विरोध असल्याने मला लग्न करायचे नाही असे त्या तरुणीने विक्रम कोळपेला सांगितले होते.

पुढारी वृत्तसेवा

Baramati Youth Death Blackmail Case

बारामती: शहरातील रुई-बयाजीनगर भागात विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून तरुणीने त्याला ब्लॅकमेल केल्याने व तिच्या कुटुंबियांनी त्याचा मानसिक छळ केल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने म्हटले आहे. आरोपी तरुणीचे वडील पुणे पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सृष्टी विकास मते, श्रुती विकास मते या बहिणींसह त्यांचे वडील विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात मयत विक्रम याचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. वाफेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. दि. १५ रोजी सायंकाळी ७ ते ७.४५ या दरम्यान ही घटना घडली. रविवारी सायंकाळी विक्रम याने त्याची बहीण सानिका हिला मंदिरात पाठवले. ती मंदिरातून घरी आली असता दरवाजाला आतून कडी लावल्याचे दिसून आले. तिने भाऊ विक्रम याला आवज दिला परंतु दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची मदत घेत खिडकीच्या गजावाटे दरवाजा उघडून आत पाहिले असता किचनच्या खोलीत विक्रम याने लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला उतरवून घेत तात्काळ येथील रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. डाॅक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.

विक्रम याच्याकडे मिळून आलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने 'आई मला माफ कर, मला खूप त्रास होतोय म्हणून मी आज हा निर्णय घेतो आहे. माझ्या आत्महत्येचे कारण फक्त सृष्टी मते ही आहे. तिने मला ब्लॅकमेल केले, माझा मानसिक छळ केला. पाच वर्षे माझा वापर केला गेला. लग्नाचे खोटे आश्वासने दिले गेले. पण जेव्हा वेळ आली तेव्हा घरच्यांचे कारण सांगून तिने फसवले. माझ्याकडे चॅट, फोटोज होते. तिच्या वडीलांच्या सांगण्यावरून मला पुण्याला बोलावून घेत पुढे कोणताही प्रूफ नको म्हणून ते डिलिट करण्यात आले. तेथे तिच्या बहिणीने तुला अडकवेन अशी धमकी दिली. विशेष म्हणजे आम्ही भेटलो तेथे त्या पूर्ण तोंड बांधून आल्या होत्या. सिंहगड काॅलेजच्या खाऊगल्लीत गोयल गंगा येथे लस्सी-वस्सी शाॅपचे २७ डिसेंबरचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा. ती मला ५ जानेवारीला भेटायला आली तेव्हाही मी तिला समजून सांगितले. त्याचं व्हॉईस रेकाॅर्ड सुद्धा आहे. तेव्हा ती बोलली मला लग्न करायचे नाही', अशा प्रकारचा मजकूर या चिठ्ठीमध्ये आहे.

विक्रम तिच्या बहिणीसह ५ जानेवारीला सृष्टी हिला पुण्यात भेटला होता. त्यावेळीही सृष्टी हिने वडीलांचा विरोध असल्याने मला लग्न करायचे नाही असे सांगितले होते. विकास मते यांना फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन वरून दमदाटी केली. त्यानंतर विक्रम बारामतीत गावी निघून आला.

या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांविरोधातभारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोट, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT