Border Ultra Marathon Pudhari
पुणे

Border Ultra Marathon: वाळवंटात बारामतीच्या युवकांची जिगर! बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण

जैसलमेर–लोंगेवाला रणभूमीत 100 किमीची ‘द हेल रेस’; प्रतिकूल हवामानात बारामतीकरांनी केला विक्रम

पुढारी वृत्तसेवा

बारामती : अत्यंत आव्हानात्मक, खडतर व क्षमतेचा कस लावणारी राजस्थानमधील बॉर्डर अल्ट्रा मॅरेथॉन - द हेल रेस बारामतीच्या जिगरबाज तरुणांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

जैसलमेर ते लोंगेवालाच्या दरम्यान दिवसा ऊन, संध्याकाळी वारा आणि रात्री शरीर गोठवणारी थंडी अशा वातावरणात येथील दादासाहेब सत्रे, बारामती सहकारी बॅंकेचे उपसरव्यवस्थापक प्रशांत शिर्के, केतनकुमार माने, राहूल शिर्के, राहूल चौधर, अनिस कोलंबोवाला, किशोर नलवडे व महेंद्र गोंडे यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.

थरच्या वाळवंटात 100 किलोमीटर अंतराची ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. ही स्पर्धा जैसलमेर ते लोंगेवालाच्या दरम्यान शारीरिक व मानसिक क्षमतांचा कस लावणारी असते. 4 डिसेंबर 1971 ला याच वाळवंटात जैसलमेर जवळच्या लोंगेवाला चौकीवर पराक्रमाची गाथा लिहिली गेली. पाकिस्तानच्या शेकडो रणगाड्यांनी लोंगेवाला चौकीवर हल्ला केला. भारताच्या शूर 120 जवानांनी पाकिस्तानच्या जवानांना चोख प्रत्युतर देत विजयी पताका फडकवली. धैर्य आणि बलिदानाने पावन झालेल्या या रणभूमिला सलाम करण्यासाठी या ऐतिहासिक संघर्षाची आठवण म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

तेथील हवामान अतिशय प्रतिकूल असते. दिवसभर तेथे तीव ऊन तळपते. सायंकाळच्या सुमारास वारा आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असते. अशा विरोधाभासी वातावरणात टिकून राहत ही स्पर्धा पूर्ण करणे मोठे आव्हान असते. प्रत्येक दहा किलोमीटर अंतरानंतर हायड्रेशन पॉईंट उपलब्ध असतो. त्यामुळे आपले पाणी, खाण्याचे साहित्य हे स्पर्धकाला स्वतःजवळ बॅगेत ठेवून दहा किलोमीटर अंतर वजानासह पूर्ण करावे लागते.

स्पर्धकांना कोणत्याही प्रकारे बाहेरील लोकांची मदत घेता येत नाही. अशी मदत घेतल्यास स्पर्धेतून त्या स्पर्धकाला बाद ठरवले जाते. या स्पर्धेमध्ये बारामतीच्या दादासाहेब सत्रे यांनी 10 तास 25 मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत संपूर्ण धावांकामध्ये चौथे स्थान मिळविले. केतनकुमार माने, प्रशांत शिर्के, राहूल शिर्के यांनी 12 तास 55 मिनिटांमध्ये तर राहूल चौधर यांनी 14 तास 34 मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. अनिस कोलंबोवाला, किशोर नलवडे व महेंद्र गोंडे यांनी 50 किलोमीटरची स्पर्धा 7 तास 21 मिनिटात पूर्ण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT