Sant Tukaram Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Baramati Palkhi Sohala: 'ज्ञानबा-तुकाराम'च्या जयघोषात विठुमय बारामती; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

शारदा प्रांगणात पालखीचा मुक्काम; काटेवाडीत आज पारंपरिक मेंढ्यांचे रिंगण, भाविकांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र गलांडे

बारामती: श्रीक्षेत्र देहू येथून पंढरीच्या दिशेने निघालेल्या जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे कविवर्य मोरोपंत, श्रीधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बारामतीनगरीत बुधवारी (दि. १५) मोठ्या दिमाखात स्वागत झाले. येथील शारदा प्रांगणात सायंकाळी सोहळा मुक्कामी विसावला. पालखी सोहळ्यानिमित्त शहरभर फडफडणाऱ्या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृदांवन घेतलेल्या माता-माउल्या, टाळ-मृदंगांचा गजर आणि हरीभजनात तल्लीन झालेले वारकरी, यामुळे अवघी बारामती विठुमय झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले. देहू ते पंढरपूर या मार्गावरील अर्धे अंतर वारकऱ्यांनी पार केले.

बारामतीच्या वेशीवर देशमुख चौकात नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्निल रावडे, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, मुख्याधिकारी पंकज भुसे, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, नारायण पवार, उपमुख्यमंत्र्यांचे कार्य अधिकारी सचिन यादव आदींनी सोहळ्याचे स्वागत केले.

उंडवडी सुपे येथील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. उंडवडी कडेपठार येथे सोहळ्याने पहिला विसावा घेतला. तेथून सोहळा बऱ्हाणपूर येथे आला. बऱ्हाणपूर ग्रामस्थांनी येथे रांगोळीच्या पायघड्यांनी सोहळ्याचे स्वागत केले. भर दुपारी येथे जेवणाच्या पंगती उठल्या. तद्नंतर सोहळा पुढे बारामतीच्या दिशेने पुढे सरकला.

मोरेवाडी येथील विसाव्यानंतर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बारामतीच्या वेशीवर पाटस नाका येथे पोहचला. वेशीवर बारामतीकरांनी जल्लोषी स्वागत केले. देशमुख चौकातून मुख्य बाजारपेठेतून गांधी चौक-भिगवण चौकमार्गे सोहळा मुक्कामाकडे निघाला. टाळ-मृदंगांच्या गजरात वारकऱ्यांनी शिस्तबद्धरीत्या दिंडीचे नियम पाळत ग्यानबा तुकारामचा जयघोष केला. पेठेतून सोहळा जात असताना पुष्पवृष्टी करण्यात आली. नगरपरिषदेसमोरील शारदा प्रांगणात सोहळा सायंकाळी उशिरा मुक्कामी विसावला. येथे समाज आरतीला भाविकांची मोठी गर्दी होती. रात्री भजन व कीर्तन पार पडले. दरम्यान, पालखीच्या दर्शनासाठी पाटस रस्त्यापासून ते शारदा प्रांगणापर्यंत मोठी गर्दी उसळली होती. शारदा प्रांगणात महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेची व्यवस्था पालिकेकडून कऱण्यात आली.

सोहळ्याच्या मुक्कामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शामियान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. जवळच पोलिसांकडून स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला होता. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने मोठी तयारी केली होती. बारामती नगरपरिषदेकडून शहरभर वारकऱ्यांसाठी निवासाची, स्नानगृह, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्यात घसरून कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी येथे विशेष टीम तैनात करण्यात आली होती. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोहळ्याच्या काळात विशेष परिश्रम घेतले.

काटेवाडीत आज रंगणार मेंढ्यांचे रिंगण

बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे रिंगण गुरुवारी (दि. १६) रंगणार आहे. मेंढपाळ बांधव त्यासाठी मेंढ्या घेऊन येथे हजर असतात. येथील रिंगण पाहण्यासाठी भाविकांकडून मोठी गर्दी होत असते. काटेवाडीत परीट समाजाकडून धोतराच्या पायघड्या अंथरून सोहळ्याचे स्वागत केले जाते. दुपारनंतर रिंगण पार पडल्यावर सोहळा इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथे प्रवेश करून सणसर मुक्कामी जाईल.

हरवलेला विठ्ठल पुन्हा आम्हा दे...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदाचा पहिलाच पालखी सोहळा बारामतीत विसावला. अजित पवार यांची उणीव यानिमित्त शहरात भासली. बारामती आणि काटेवाडीत ते सोहळ्यात सहभागी होत. काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी सोहळाप्रमुख, दिंडीप्रमुखांसाठी भोजनव्यवस्था केली जायची. त्यांच्या पश्चात यंदाचा सोहळा पार पडला. परंतु, शहरभर त्यांची उणीव भासत असल्याचे भावनिक फ्लेक्स लागले गेले. 'पंढरीच्या राया एवढेच दान दे, हरवलेला आमचा विठ्ठल पुन्हा आम्हा दे' या आशयाच्या भावनिक फलकांनी त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT