

पुणे: भारतीय रेल्वेच्या सुरक्षेमध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणणाऱ्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुणे-मिरज रेल्वेमार्गावर विभागातील पहिली स्टँडर्ड कवच ही स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. १४) गाडी क्रमांक ०१०२३ पुणे-एससीएसएमटी कोल्हापूर विशेष गाडीसोबत या प्रणालीचे प्रत्यक्ष संचालन सुरू करण्यात आले.
याप्रसंगी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) पी. यू. जाधव यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक पथक उपस्थित होते. कवच ही पूर्णपणे भारतात विकसित झालेली स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे.
ही प्रणाली धावत्या गाड्यांच्या हालचालींवर सतत आणि बारीक लक्ष ठेवते. त्यामुळे लोको पायलटला निर्धारित वेगमर्यादा पाळणे आणि सुरक्षित रेल्वे संचालन करणे सोपे जाणार आहे. गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास किंवा धोक्याची घंटा असल्यास, ही यंत्रणा आपोआप ब्रेक लावून दुर्घटना टाळण्यास सक्षम आहे.
पुणे-मिरज मार्गावरील या यशानंतर आता पुणे विभागातील इतर निवडक मार्गांवरही टप्प्याटप्प्याने कवच प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे भविष्यात प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह होणार आहे. डीआरएम राजेश कुमार वर्मा यांनी या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या रेल्वेचे अधिकारी, अभियंते आणि तांत्रिक पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पुणे-मिरज मार्गावर स्टँडर्ड कवच प्रणालीचे यशस्वी कार्यान्वयन हा आमच्या पुणे विभागासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. ही प्रणाली रेल्वेच्या सुरक्षिततेमध्ये आणि वेळेच्या अचूकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. भारतीय रेल्वेच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आमचे हे पाऊल असून, लवकरच विभागातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरही या तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाईल.
हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग, मध्य रेल्वे