बारामती: बारामती शहर, उपनगर आणि एमआयडीसी परिसरात वाढत्या अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असून, नागरिकांचा अक्षरशः श्वास कोंडला जात आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्रास वाहन पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कसबा चौक, गुणवडी चौक, गांधी चौक, इंदापूर चौक, तीन हत्ती चौक, पंचायत समिती चौक, सातव चौक, पेन्सिल चौक, सूर्यनगरी परिसर तसेच रिंगरोडवर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना पार्किंग व्यवस्थेचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. गणेश भाजी मंडई येथील वाहनतळ सुरू होऊनही शहरातील पार्किंगचा प्रश्न सुटलेला नाही. ठिकठिकाणी रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि हातगाड्यांमुळेही अडथळा येत आहे. फुटपाथवर विक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे.
शहरातून जड वाहनांना बंदी असतानाही अनेक अवजड वाहने शहरातूनच ये-जा करतात. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. निवडणुका संपल्यानंतर नगरपालिका प्रशासन, पोलिस विभाग आणि आरटीओ यांनी संयुक्त कारवाई करून अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आणि नियमबाह्य वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी बारामतीकरांकडून होत आहे. भविष्यात शहराची लोकसंख्या आणि वाहनसंख्या वाढणार असल्याने कायमस्वरूपी वाहतूक आराखडा राबविण्याची गरज आहे.
अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल
बारामती शहर, उपनगर आणि रिंग रोड परिसरात पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. हातगाडे, व्यावसायिक आणि अनधिकृत विक्रेत्यांनी पदपथ व्यापल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतुकीतही अडथळे निर्माण होत आहेत. अपघात रोखण्यासाठी यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी नगरपालिका, पोलिस आणि आरटीओ प्रशासनाने अधिक सक्रिय होण्याची गरज आहे.