

मंचर: गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या विकासकामांमुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने यापूर्वी 31 मेपासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या अपूर्ण कामांचा वेग पाहता मंदिर नियोजित तारखेला खुले होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात सुमारे 288 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत विविध कामे सुरू आहेत. यामध्ये पायरी मार्ग, सभा मंडप तसेच इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे.
मात्र, अद्याप अनेक कामे पूर्णत्वास गेलेली नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे भाविक आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये संभम आणि चिंता वाढली आहे. विशेषतः पाच महिन्यांपासून दर्शन बंद असल्यामुळे मंदिर परिसरातील धार्मिक पर्यटनावर परिणाम झाला आहे. स्थानिक व्यवसायांनाही त्याचा फटका बसत आहे. प्रशासन नियोजित वेळेत कामे पूर्ण करून मंदिर खुले करते की पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर करते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
मंदिर बंद असल्यामुळे परिसरातील हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. भाविकांची संख्या घटल्याने उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने कामे पूर्ण करून लवकर निर्णय घ्यावा.
बाबाजी निघोट, हॉटेलचालक, मंचर
भीमाशंकर हे श्रद्धेचे केंद्र आहे. दर्शनासाठी वारंवार तारखा बदलल्याने भाविकांमध्ये संभम निर्माण होत आहे. प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करून दर्शनाबाबत निश्चित माहिती द्यावी.
सूर्यकांत धायबर, संस्थापक अबरनाथ सेवा संघ मंचर
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिराच्या सभामंडपाच्या डोमचे काम प्रगतीपथावर आहे. 870 दगडांपैकी दोनशे दगड लावायचे राहिले आहेत. ते काम चार-पाच दिवसांत पूर्ण होईल. तसेच, पायरी मार्गाचे काम 90 ते 95 टक्के पूर्ण झाले असून, पायरी मार्ग लवकर खुला केला जाईल. हे काम करण्यासाठी 80 मजूर आणि विविध मशनरी काम करत आहे.
उमेद सुद्रिक, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव.