Law Pudhari
पुणे

Baramati Teacher Case: अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी शिक्षकाला २० वर्षांची शिक्षा; ४५ हजारांचा दंड

बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सात साक्षीदार आणि ठोस पुरावे ठरले निर्णायक

पुढारी वृत्तसेवा

बारामती: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी शिक्षकाला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून, ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. किशोर धनुषा उर्फ आप्पाण्णा मधुरे असे शिक्षा झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मधुरे हा यवत येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी जवळीक साधून तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तिच्या पालकांच्या ताब्यातून तिला दूर नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने पीडित मुलीची साक्ष, तिच्या वडिलांचा पुरावा, पालकांची साक्ष, हॉटेलमधील नोंदी, घटनास्थळाचे पंचनामे, कपड्यांची जप्ती, वैद्यकीय कागदपत्रे तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी सात साक्षीदार तपासले. त्यांना अॅड. योगेश लालबिगे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे मुलीची साक्ष, तिच्या वयाचा पुरावा, पालकांची साक्ष, हाॅटेलमधील नोंदी, घटनास्थळ पंचनामे, कपड्यांची जप्ती, वैद्यकीय कागदपत्रे महत्त्वाची ठरली.

अॅड. शिंगाडे यांचा युक्तिवाद व उपलब्ध पुरावे ग्राह्य धरत न्यायाधिश पाटील यांनी आरोपी शिक्षकाला २० वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला यवतचे प्रभारी पोलिस अधिकारी संतोष तासगावकर, अभिमन्यू कवडे, रियाज मणेरी, वेनूनाद ढोपरे, लिपिक सुनिता कांबळे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT