बारामती: बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात रात्रीच्या वेळी मैत्रिणीसह बसलेल्या तरुणाकडील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली. गुन्ह्यातील 3 लाख 24 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. प्रसाद गणपत भोसले (वय 24), धैर्यशील प्रशांत आगवणे (वय 19) व कृष्णा नाना गाडेकर (वय 21, सर्व रा. तांदुळवाडी, बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना दि. 28 फेबुवारी रोजी अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 फेबुवारी रोजी रात्री 8.40 वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत एका बॅंकेत सहाय्यक व्यवस्थापक असलेला फिर्यादी तरुण हा त्याच्या मैत्रिणीसह गप्पा मारत बसला होता. या वेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर, कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली.
विरोध केल्यावर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या पायावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी सोन्याची 21 ग््रॉम वजनाची साखळी (किंमत 3 लाख रुपये), चांदीची अंगठी (5 हजार रुपये), चांदीची चैन (15 हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (2 हजार रुपये) व 2 हजार रुपये रोख असा एकूण 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला व ’परत इकडे यायचं नाही’ अशी धमकी देत तेथून पसार झाले.
याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 309 (6), 3(5) अन्वये दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीवरून या तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 3 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलिस अंमलदार सुरेंद्र वाघ भारत खारतोडे मनोज पवार जीतेंद्र शिंदे राजू बन्ने व पथकाने केली.