

लेण्याद्री: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. श्री शिवनेरी स्मारक समिती, जुन्नर शहर शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 6 मार्च 2026 दरम्यान तीनदिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी 4 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत शिवजन्मस्थळ परिसरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळणारा गड आणि शिवजन्मभूमीचा परिसर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री गिरीभमण संस्था, जुन्नर यांनी केले आहे. गुरुवारी 5 मार्च रोजी सकाळी 6 वाजता शिवनेरी गडावरील प्रथम वेशीपासून गड प्रदक्षिणेला प्रारंभ होणार आहे. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या प्रदक्षिणेत सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री गिरिभमण संस्थेच्या वतीने करण्यात आले असून, छत्रपतींच्या जन्मभूमीची परिक्रमा करताना ‘शिवगर्जना’ने गड दुमदुमणार आहे.
6 मार्च: मुख्य शिवजन्मोत्सव सोहळा
शुक्रवारी 6 मार्च रोजी सकाळी 7 वाजता शिवाई मातेस अभिषेक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 8 ते 9 या वेळेत श्री शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ अशी छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. साडेआठ ते साडेनऊ या वेळेत भव्य शिवजन्म सोहळा, ध्वजारोहण, शिववंदना, ध्येयमंत्र पठण, तसेच ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ वितरण समारंभ होणार आहे. ‘रणरागिणी नारीशक्ती, इंद्रायणीनगर भोसरी’ यांच्याकडून छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा सादर केली जाणार आहे.
राज्यसभेच्या खासदार डॉ. मेघाताई कुलकर्णी, मानद पशु कल्याण अधिकारी, गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी तसेच व्याख्याते व लेखक सुधीर गाडे यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. या वर्षीच्या जिजाऊ पुरस्काराच्या मानकरी पुढीलप्रमाणे सौ. ऊर्मिला गोटीराम थोरवे, श्रीमती सुनंदा निवृत्ती मडके, सौ. शीतल श्रीपाद ठुसे, सौ. उज्ज्वला दिलीप लोहोकरे, सौ. ज्योती नितीन शेलार व श्रीमती पुष्पाताई गोसावी.
सकाळी 10 ते 11 या वेळेत शिवजागर धार्मिक कार्यक्रम, पोवाडे, तसेच जाहीर धर्मविचार मंथन धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख वक्ते म्हणून सुधीरजी गाडे व खासदार डॉ. मेघाताई कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 12 वाजता किल्ले शिवनेरी पायथ्याशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 ते 10 या वेळेत जुन्नर शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढून सांगता सभा घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र जन्मभूमीवर तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या शिवजन्मोत्सवासाठी जुन्नर परिसरातील, तसेच राज्यभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, संपूर्ण शिवनेरी परिसर भगवामय होण्याची तयारी पूर्ण झाली आहे.