बारामती: राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'ऊर्जा स्वातंत्र्याचा' नवा अध्याय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून लिहिला जात आहे. शेतीपंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे सिंचनव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे.
या योजनेमुळे बारामती परिमंडलातील १ लक्ष ४३ हजार शेतकऱ्यांना दिवसा विजेचा लाभ होत आहे, तर सौरपंपामुळे ५८ हजार ६८४ शेतकऱ्यांना हक्काची, शाश्वत, दिवसा व मोफत वीज उपलब्ध झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कृषी भार अधिक असलेल्या वीज उपकेंद्रांच्या परिसरात कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येत आहे.
या कृषी ग्राहकांना यापूर्वी आवर्तन पद्धतीने दिवसा किंवा रात्री वीजपुरवठा केला जात असे. रात्रीच्या वेळी शेतीपंप चालविण्यामुळे शेतकऱ्यांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून सोलापूर मंडळात ९८४ एकर जमिनीवर २४३ मेगावॅट क्षमतेचे ४३ प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यामुळे ५० हजार ३६० शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. सातारा मंडळात ८६१ एकर जमिनीवर १७५ मेगावॅटक्षमतेचे ४२ प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यामुळे ५७ हजार ४३८ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. बारामती ग्रामीण मंडळात ५५५ एकर जमिनीवर १११ मेगावॅटक्षमतेचे २२ प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यामुळे ३५ हजार ५४१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
५८ हजार सौर कृषी पंप
कुसुम, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून शाश्वत पाण्याचा स्रोत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ अश्वशक्तीचे पंप केवळ ५ ते १० टक्के लाभार्थाी हिस्सा भरून केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत बारामती परिमंडलात ५८ हजार ६८४ सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. त्यात सोलापूर मंडळात ३८ हजार ६०, सातारा मंडळात ७ हजार ५९६, बारामती ग्रामीण मंडळात १३ हजार २८ सौर कृषी पंप बसविले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती परिमंडलाने केले आहे.