काटेवाडी:रेशीम शेती व उद्योगाच्या क्षेत्रात बारामती तालुका राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नवा मानबिंदू ठरत आहे. बारामती येथील कोश खरेदी-विक्री केंद्रात इनाम पद्धतीने रेशीम कोशांची खरेदी सुरू करण्यात आली असून, अशी अभिनव पद्धत राबविणारे बारामती हे भारतातील पहिलेच कोश खरेदी केंद्र ठरले आहे. या नव्या उपक्रमामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला पारदर्शक, स्पर्धात्मक व योग्य दर मिळत असून, मध्यस्थांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांचा थेट आर्थिक फायदा वाढत आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात येणारे कोशोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र अंतिम टप्प्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी व नवउद्योजकांना कोशापासून रेशीम धागा निर्मिती, रीलिंग, प्रक्रिया तसेच रेशीम वस्त्रनिर्मितीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा प्रकारचे कोशोत्तर प्रशिक्षण देणारे हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी केवळ कच्चा माल विक्रीपुरते मर्यादित न राहता मूल्यवर्धनाच्या संधींकडे वळणार असून उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
येत्या काळात बारामती तालुक्यात खासगी स्तरावर चॉकी सेंटर, ऑटोमॅटिक रीलिंग मशिन यांसारखे आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांमुळे रेशीम धाग्याची गुणवत्ता अधिक सुधारणार असून उत्पादन खर्चात बचत होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. परिणामी, तुती लागवडीपासून ते रेशीम वस्त्रनिर्मितीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी तालुक्यातच उभी राहणार आहे.
नावीन्यपूर्ण खरेदी पद्धत, आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि खासगी गुंतवणुकीच्या समन्वयातून बारामतीत उभा राहत असलेला रेशीम उद्योगाचा हा नवा मॉडेल केवळ तालुक्यासाठीच नव्हे तर राज्य व देशातील इतर तालुक्यांसाठीही दिशादर्शक ठरणार आहे.
बारामतीतील इनाम पद्धतीची कोश खरेदी ही शेतकरीहिताची क्रांतिकारी पायरी आहे. कोशोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र आणि आगामी आधुनिक प्रकल्पांमुळे रेशीम शेती व उद्योगाची वाटचाल अधिक वेगाने होईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, उद्योजकतेला चालना मिळेल आणि बारामती रेशीम उद्योगाचे महत्त्वाचे ‘हब’ म्हणून पुढे येईल.संजय फुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी