जळोची: बारामती शहरातील शाकंभरीदेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये देवीचे भजन, अभिषेक, श्रीसूक्त पाठ, दुर्गा सप्तशती पाठवाचन, होमहवन आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहेत.
बारामती तालुका देवांग व हटगर कोष्टी समाज यांनी ७ गुंठ्यांत पेशव्यांचे सावकार श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यासमोर, सद्गुरू मठ शेजारी १९५० च्या दशकात सदर मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. मूळ कर्नाटक राज्यातील बदामी येथील देवीचे स्थान आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात शाकंबरी, चौंडेश्वरी, बनशंकरी अशा विविध नावाने ती प्रसिद्ध आहे. तिची विविध ठिकाणी मंदिरे आहेत.
सर्वत्र दुष्काळ होता, खाण्यास अन्न नव्हते तेव्हा देवीने स्वतःच्या शरीरातून भाजीपाला व फळेनिर्मिती केली आणि लोकांना अन्नपुरवठा केला म्हणून शाकंभरी हे नाव पडले, अशी दंतकथा आहे. या देवीची मूर्ती सिंहावर बसलेली असून हातात विविध आयुधे आहेत. गाभारा दगडी बांधकाममध्ये असून इतर कामे सागवानी लाकूड व पत्रा वापरून केला आहे.
कर्नाटक राज्यातील बदामी येथील प्रथेप्रमाणे बारामतीमध्ये डिसेंबर व जानेवारीमध्ये देवीचा नवरात्र उत्सव असतो. वसंत पंचमीला मंदिर स्थापन झाले म्हणून भंडारा असतो. पालखी सोहळा बारामती शहरातून निघतो. विश्वस्त म्हणून नितीन डोईफोडे, अभिषेक पांडकर, शरद ढवळशंख, सुरेश टेके, नारायण भंडारी मंदिर समितीचे काम पाहतात.
नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. जे भाविक बदामी कर्नाटक येथे जाऊ शकत नाहीत, ते नवरात्र उत्सव व नित्यनेमाने दर्शन करण्यासाठी शाकंभरी मंदिर या ठिकाणी येत असतात.
मंदिर जीर्णोद्धाराचे नियोजन
सध्या मंदिराचे नूतनीकरण करण्याचे नियोजन असून, जीर्णोद्धारासाठी भाविकांनी मदत करावी, असे आवाहन शाकंभरी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.