Crop Loss Pudhari
पुणे

Baramati Kharif Crops: बारामतीच्या जिरायती पट्ट्यात पावसाची दडी; खरीप पिके संकटात, शेतकरी चिंतेत

शिर्सुफळसह पाच गावांत दमदार पावसाची प्रतीक्षा; खडकवासला आवर्तनामुळे काही पिकांना मिळणार दिलासा

पुढारी वृत्तसेवा

शिर्सुफळ: बारामती तालुक्यातील शिर्सुफळसह गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी आणि उंडवडी सुपे या जिरायती पट्ट्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे खरीप पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

या भागातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा या भागात एकही दमदार पाऊस झाला नाही. सुरुवातीला तुरळक सरींनी हजेरी लावली. त्यावर बाजरी, मका, तूर, भाजीपाला आदी पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला. आता गरज असतानाही पिकांना पाणी मिळत नाही. काही ठिकाणी उसाच्या वाढीवरही परिणाम होत आहे.

दरम्यान, शिर्सुफळ येथील तलावात खडकवासला धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. या तलावातून साबळेवाडी, गाडीखेल, उंडवडी सुपे, उंडवडी कप यांसह परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. या आवर्तनामुळे बाजरी, मका, तसेच भाजीपाला पिकांना काही प्रमाणात जीवनदान मिळणार आहे.

पिकांची वाढ खुंटली

जिरायती भागात सर्वच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ऊस पिकाला पाणी देऊनही उसाची वाढ होत नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटत असून, खरीप उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दमदार पावसाची प्रतीक्षा

या जिरायती पट्ट्याला सध्या दमदार पावसाची गरज आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास खरीप हंगामाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शिरसाई योजनेच्या आवर्तनामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी सर्व शेतकऱ्यांना समाधान देण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT