Crop Pudhari
पुणे

Baramati Rain Deficit: बारामतीत पावसाने दडी मारली; खरीप पिके सुकली, ऐन पावसाळ्यात ‘पावसाळा की उन्हाळा?’

ऑगस्टमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश स्थिती; सोयाबीन, बाजरी, मक्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील जिरायती व बागायती भागात ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणीसाठेही झपाट्याने कमी होत आहेत. ऐन पावसाळ्यात बारामतीत छत्रीऐवजी टोपी आणि चष्मा वापरण्याची वेळ आली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर रात्री जोरदार वारे सुटत आहेत.

पावसाअभावी ओढे, नाले, तळी आणि लहान-मोठे पाणवठे कोरडे पडले आहेत. पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने साथ न दिल्याने सोयाबीन, बाजरी, मका तसेच इतर पिकांवर परिणाम झाला आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे.

विहिरी, बोअरवेलमधील पाण्याचा वापर करून पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः शेळी-मेंढीपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चाऱ्याच्या उपलब्धतेबरोबरच त्याच्या वाढत्या दरामुळे पशुपालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

गणेशोत्सवासह सणासुदीच्या काळात पावसाअभावी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाणवू लागली आहे. शेतीचे उत्पन्न धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. दुसरीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने शीतपेय व इतर थंड पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बारामती तालुक्याला दमदार आणि सलग पावसाची नितांत गरज आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पावसाळा की उन्हाळा?

पावसाळ्यात छत्री, रेनकोट यांची गरज भासते; मात्र, यंदा जिरायती भागात उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल आणि डोक्यावर रूमाल घेऊन नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे 'पावसाळा की उन्हाळा?' असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT