बारामती: बारामती-निरा या राज्यमार्गावरील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच इतर प्रवाशीही वाढत आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन बारामती आगाराने या मार्गावर दर 15 मिनिटांनी नियमित एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत बारामती आगारप्रमुख रविराज घोगरे म्हणाले की, विद्यार्थिनींची होणारी गैरसोय, सकाळच्या वेळेतील गर्दी आणि असुरक्षितता या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. त्यानंतर या समस्येवर तातडीने तोडगा काढत एसटीने अतिरिक्त फेऱ्यांची व्यवस्था केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनी, महिला कामगार आणि एमआयडीसीतील कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही सेवा तत्काळ सुरू करण्यात आली असून, सकाळ-संध्याकाळच्या वेळेत प्रवाशांना सातत्याने बस उपलब्ध राहणार आहे.
यासाठी एसटीचे माजी विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांचे सहकार्य लाभले. निरा-बारामती मार्गावरील विद्यार्थिनींच्या अडचणी लक्षात घेऊन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक लक्ष्मण गोफणे यांनी स्वतः गायकवाड यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थी व महिला प्रवाशांच्या अडचणीची सांगितल्या. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत एसटी प्रशासनाने तत्काळ पावले उचलली.
निरा-बारामती मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना वेळेत शाळा-महाविद्यालय जाण्यास अडचणी येत होत्या. महिला कामगार विविध कामानिमित्त बारामतीला नियमित ये-जा करतात. तसेच एमआयडीसी परिसरात हजारो कामगार कार्यरत असल्याने जलद व सतत उपलब्ध होणाऱ्या बससेवेची मोठी गरज भासत होती. या नवीन फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि वेळेवर होईल, असे आगार प्रशासनाने सांगितले.