

बावडा: पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांना वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये डिसेंबरअखेरही तब्बल 117.23 टीएमसी पाणीसाठा शनिवारी (दि.13) झालेला आहे. परिणामी, चालू वर्ष हे शेतीसाठी सुजलाम सुफलाम जाणार, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या पूर्णपणे बंद आहे.
उजनी धरण हे पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असून, इंदापूरपासून अवघ्या 10 किमी अंतरावर आहे. या धरणास 41 दरवाजे असून, हे धरण स्थापत्य केलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. उजनी धरणामध्ये शनिवारी सायंकाळी 6 वाजताचा पाणीसाठा हा 117.23 टीएमसी एवढा आहे. धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 53.57 टीएमसी एवढा असून, त्याची टक्केवारी 100 एवढी आहे.
सध्या उजनी धरणाच्या दरवाजातून विद्युतनिर्मितीसाठी, सीना माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, बोगदा तसेच मुख्य कालव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग हा सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. उजनी धरणामध्ये दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग शनिवारी सायंकाळी 409 क्युसेक एवढा आहे. एकंदरीत, उजनी धरणामध्ये डिसेंबरअखेरही पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.