बारामती: बारामती नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलल्याने मध्यंतरी प्रचाराला काहीसा बेक लागला होता. आता नव्या वेळापत्रकानुसार 10 डिसेंबरला चिन्हवाटप पार पडल्यानंतर शहरात पुन्हा प्रचार सुरू झाला आहे. शहरभर स्पीकर लावून विविध पक्ष, अपक्षांच्या रिक्षा प्रचारासाठी फिरत आहेत.
बारामती नगरपरिषद निवडणूक प्रचाराचे मध्यंतरी शांत झालेले वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विविध कारणांमुळे मंदावलेला प्रचार पुन्हा जोमात सुरू झाला आहे. उमेदवार, कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा वेग वाढवला आहे. शहरातील प्रमुख भागांत पदयात्रा, संवाद, कोपरा सभा, दरोदारी भेटींचा उत्साह पुन्हा दिसू लागला आहे.
विकासकामांची यादी, प्रलंबित प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व नागरिक सुविधा या मुद्द्यांवर राजकीय चर्चा तापल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास, भाजप, दोन्ही शिवसेना, बहुजन समाज पक्ष व अन्य पक्षांसह अपक्ष बारामतीत निवडणूक रिंगणात आहेत. पक्षांसह अपक्षांनीही आता पुन्हा जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. तरुण कार्यकर्त्यांची फौज, महिलांचे गट शहरभर प्रचार करीत आहेत. आपापल्या पक्षाचे जाहीरनामे मतदारांपर्यंत पोहोचविले जात आहेत. यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. निवडणुकीतील पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. प्रचाराने घेतलेली गती अंतिम टप्प्यात रंगत वाढवणारी ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग््रेासने (अजित पवार) सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवारांनी हायटेक प्रचाराला सुरुवात केल्याने निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी वेळ लागत आहे. मतदान 20 डिसेंबर रोजी होत असल्याने प्रचारासाठी अजून सात दिवस शिल्लक आहेत. या वेळेत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यासाठी उमेदवारांनी प्रचारयंत्रणा उभी केली आहे. बारामती शहरात सकाळपासून रात्रीपर्यंत घरभेटी व प्रचार रॅली सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री घेणार सांगता सभा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग््रेासच्या पॅनेलसाठी सांगता सभा घेणार आहेत. त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. भाजप व शिवसेना स्वतंत्र लढत आहेत. त्यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्र्यांच्या सभा व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीत एकत्र असलेले राज्यातील हे बडे नेते बारामतीत सभा घेतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.