बारामती: बारामती नगरपरिषदेबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीसह जिल्ह्यातील फुरसुंगी-उरुळी देवाची या दोन पालिकांचा पूर्ण निवडणूक कार्यक्रम आणि तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड व सासवड येथील काही प्रभागांतील निवडणुका 20 डिसेंबर रोजीच होणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी यांनी यासंबंधीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली.
बारामती व फुरसुंगी-उरुळी देवाची या दोन पालिकांच्या नगराध्यक्षपदासह सदस्यपदाची निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या दोन ठिकाणची निवडणूक पुढे ढकलली गेली होती. नगराध्यक्षपदासह सदस्यपदांबाबत आक्षेप असल्याने पूर्ण निवडणूकच पुढे ढकलली गेली.
यासह जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पालिकेतील प्रभाग 2 अ, प्रभाग 7 अ, 7 ब, प्रभाग 8 अ, 8 ब, प्रभाग 10 ब येथील सदस्यपदाची निवडणूक 20 रोजी होईल. लोणावळा पालिकेच्या प्रभाग 5 ब व प्रभाग 10 अ, दौंड पालिकेच्या प्रभाग 9 अ, तर सासवड पालिकेच्या प्रभाग 11 असाठी 20 रोजी मतदान होणार आहे.
यासाठी दाखल नामनिर्देशनपत्रे 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी 11 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. 20 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडेल. दि. 21 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे.
या पालिकांसह ज्या पालिकांचे मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले, त्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 21 डिसेंबर रोजी होणार आहे. बारामतीची मतमोजणी येथील मएसोच्या ग. भि. देशपांडे विद्यालय सभागृहात, फुरसुंगी-उरुळी देवाची येथील मतमोजणी शंभू महादेव ट्रस्टच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, तळेगावची नवीन प्रशासकीय इमारत लक्ष्मीबाग कॉलनी येथे, लोणावळ्याची प्रशासकीय इमारत तळमजला, दौंडची शासकीय धान्य गोदाम अहिल्यानगर रोड येथे, तर सासवडची सासवड नगरपरिषद कार्यालय पहिल्या मजल्यावर मतमोजणी होणार आहे.