बारामती: बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरु असली तरी ते निवडणूक लढवणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Latest Pune News)
राष्ट्रवादी काँग्रेसकडून येत्या गुरुवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. सामाजिक प्रश्नाची जाण, आजवरचे सामाजिक काम आणि जनसामान्यातील त्या व्यक्तिचे स्थान या बाबी लक्षात घेवून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीत सहयोग सोसायटी निवासस्थानी त्यांनी रविवारी (दि. ९) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, “राज्यातील २८८ नगरपालिका-नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. शनिवारी पुण्यात जिल्ह्याचा आढावा घेतला. तत्पूर्वी सोमवार ते शुक्रवार राज्याचा आढावा घेतला. रविवारी बारामतीत सकाळपासून चाचपणी केली. पूर्वी बारामतीत आघाड्यांद्वारे निवडणूक लढवली जायची. जे निवडून येतील ते शरद पवार यांचे असे मानले जायचे. मी १९९१ ला खासदार झाल्यानंतर पक्ष चिन्हावर निवडणूका लढवायचा निर्णय घेतला. पक्ष चिन्हावर लढले नाही तर तुम्हाला व्हीप बजावता येत नाही. काही मर्यादा येतात. काही पक्ष विरोधी गोष्टी घडल्या तर कारवाई करता येते. त्यानुसार मी आजवर निवडणूका लढवल्या.”
“पुढील पाच वर्षात बारामतीसह माळेगावचा कायापालट करणार आहे. इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी (दि.१३) सकाळी सातपासून मुलाखती घेतल्या जातील. सुरुवातीला बारामती नगरपरिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या व नंतर नगरसेवकपदाच्या मुलाखती पार पडतील. त्यानंतर मेळावा होईल. दुपारनंतर माळेगाव नगरपंचायतीसाठी मुलाखती व मेळावा होईल. या मेळाव्यात मी माझे मत सांगेन. राष्ट्रवादीकडून ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांनी गुरुवारनंतरच अर्ज दाखल करावेत,” असे अजित पवार यांनी सांगितले.
प्रचारासाठी पाच-सहा दिवस हातात असतील. त्यात राज्यातही प्रचार करावा लागेल. त्याचे नियोजन मंगळवारी राष्ट्रवादीकडून मुंबईत केले जाईल, असे त्यांनी सांगितले. बारामतीत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. अजूनही अनेक कामे बाकी आहेत. शहरातील पथदिवे सौर उर्जेवर चालविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुलाखती घेतल्यावर नगराध्यक्ष पदाचा तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले जातील. २०१६ ला नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असताना आम्ही तेथे महिलेला संधी दिली. शहराचा प्रथम नागरिक प्रश्नांची जाण असणारा असावा या दृष्टीने उमेदवार दिला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.