बारामती: बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी गुरुवारी (दि. 13) येथील राष्ट्रवादी भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीनंतर मेळाव्यात ते किमान नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तरी जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त होती. परंतु पवार यांनी ’सस्पेन्स’ कायम ठेवला. अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत वाट न बघता लवकरच ही यादी अंतिम करून प्रचार सुरू केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती नगरपरिषदेत नगराध्यक्ष व 41 नगरसेवक अशा 42 जागा आहेत. माळेगाव नगरपंचायतीत नगराध्यक्ष व 17 नगरसेवक अशा 18 जागा आहेत. माळेगावचे ग्रामर्पंचायतीतून नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी वर्चस्व राखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीने लक्ष घातले आहे. बारामतीत त्यांच्या राष्ट्रवादीकडे नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी एकूण 325 जणांनी, माळेगावात 107 जणांनी उमेदवारी मागितली आहे. या इच्छुकांच्या मुलाखती पवार यांनी गुरुवारी सकाळी 7 पासूनच सुरू केल्या.
सुरुवातीला बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक व नंतर नगरसेवक पदासाठी मुलाखती पार पडल्या. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा पार पडला. सायंकाळी उशिरा माळेगावसाठी मुलाखती सुरू झाल्या. कार्यकर्ता मेळाव्यात पवार हे काही हक्काच्या प्रभागातील जागांसह दोन्ही ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करतील अशी चिन्हे होती. परंतु पवार यांनी ते टाळले. यापूर्वी निवडणूक अर्जासोबतच उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म द्यावा लागत होता. यंदा ती मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे नाराजीतून बंडखोरी होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेण्याच्या उद्देशाने नावे जाहीर केली नसावीत, अशी शक्यता आहे.
चांगलाच उमेदवार देणार
पवार यांनी बारामती व माळेगावच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उमेदवारीचा ’सस्पेन्स’ कायम ठेवला. ते म्हणाले, काहीजण माझी ही शेवटचीच निवडणूक आहे, असे सांगत उमेदवारी मागत आहेत. हे मला सांगायची गरज आहे का.. मी 35 वर्षे घासली आहेत. पार डोक्याचे केस न केस गेले माझे... मी चांगला, कामाचाच उमेदवार देणार, असे सांगत त्यांनी उमेदवार कसा असेल याचे संकेत दिले. परंतु, नाव मात्र जाहीर केले नाही.
इच्छुकांतच जुंपली
पवार यांनी बंद दाराआड मुलाखती घेतल्या. परंतु, बारामती नगरपरिषदेच्या एका प्रभागातील मुलाखती सुरू असताना इच्छुकांमध्येच जुंपल्याची चर्चा राष्ट्रवादी भवनात होती. एका इच्छुकाने दुसऱ्या व्यक्तीने सार्वजनिक कामाचे नुकसान कसे केले, याचा व्हिडीओच पवार यांना दाखवला. तर अन्य एका इच्छुकाला तीन अपत्ये असल्याचा मुद्दा पवार यांच्यापुढे मांडला. त्यातून इच्छुकांतच शाब्दिक बाचाबाची झाली. पवार यांनी त्यांना दालनाबाहेर काढल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती.
पक्ष चिन्हावर निवडणूक लढवणार
बारामती व माळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या विचारांचे लोक निवडून द्या. असे आवाहन पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले. पक्षचिन्हावरच या निवडणूका लढवल्या जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
जय पवार लढणार नाहीत
जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी अशी मागणी होती. परंतु त्यासाठी ज्याला त्याला आवड लागते. आमच्या सहा-सात भावंडात केवळ मला राजकारणाची आवड असल्याने मी या क्षेत्रात आलो, असे सांगत त्यांनी जय पवार हे निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले.
महिला अध्यक्षा दालनाबाहेरच
राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या. या वेळी राष्ट्रवादीचे शहर व तालुकाध्यक्ष पवार यांच्यासोबत दालनात उपस्थित होते. परंतु, दोन्ही ठिकाणच्या महिलाध्यक्षांना मात्र दालनाबाहेरच थांबविले गेले. उपस्थित इच्छुक महिलांनीसुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली.