Illegal Liquor Pudhari
पुणे

Baramati Illegal Liquor Trade: बारामतीत हातभट्टी दारूचा सुळसुळाट; ताडीविक्रीमुळे जीवितहानीनंतरही कारवाई अपुरी

नीरा-कऱ्हा नदीकाठावर अवैध दारूभट्‍ट्या सुरूच; कठोर कायदेशीर कारवाईची नागरिकांकडून मागणी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यात अवैध हातभट्टी दारू, बेकायदा ताडीविक्रीने गावागावांत अक्षरशः उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वी ताडीसेवनामुळे बारामती तालुक्यात तरुणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून अद्यापही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आता विषारी हातभट्टीच्या दारूने अनेकांचे जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

बारामती तालुक्यातून निरा आणि कऱ्हा नदी वाहते. या दोन्ही नद्यांच्या काठांवर, दाट झुडपांत गावठी हातभट्‌‍ट्या लावल्या जातात. बारामती तालुका, शहर व वडगाव निंबाळकर पोलिसांकडून त्यावर वारंवार कारवाई केली जाते. परंतु महत्त्वाची जबाबदारी असणारे राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे झोपेचे सोंग घेतलेल्या अवस्थेत आहे.

बारामती शहरापासून ग््राामीण भागापर्यंत अनेक ठिकाणी हातभट्‌‍ट्या सुरू असल्याच्या चर्चा उघडपणे होत आहेत. नदीकाठ, ओढ्यांच्या परिसरात, ऊसशेतीच्या आडोशाला आणि निर्जन भागात हातभट्टीची दारू तयार होत असल्याचे बोलले जाते. काही गावांमध्ये तर या व्यवसायाने संघटित स्वरूप धारण केल्याची स्थिती आहे. स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी होतात. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई केली जाते, परंतु पुन्हा काही दिवसांतच ही मंडळी पुन्हा दारूअड्डे सुरू करतात. त्यामुळे या कारवायांची त्यांना भीतीच उरली नसल्याची स्थिती आहे.

विशेष म्हणजे, ताडीमुळे काही तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण तालुकाभर मोहीम राबवून बेकायदा मद्यविक्री केंद्रे बंद करणे, हातभट्‌‍ट्या उद्ध्वस्त करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. उलट अनेक भागांत अवैध दारू आणि ताडीविक्री पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.

ग््राामीण भागात अनेक कुटुंबे या अवैध व्यवसायामुळे उद्ध्वस्त होत आहेत. हातभट्टीच्या दारूच्या व्यसनामुळे घरगुती वाद, आर्थिक संकट, महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. अनेक युवक स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या या दारूच्या आहारी जात आहे. त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तरीही संबंधित विभागांकडून व्यापक जनजागृती किंवा कठोर प्रतिबंधात्मक कारवाई होताना दिसत नाही. हातभट्टीचा विळखा इतका घट्ट झाला आहे की, आता अशी दारू थेट प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्याचे फुगे तयार करून ते विकले जात आहेत.

...तर कडक शिक्षा होईल

बारामती तालुक्यात शहर, तालुका व वडगाव पोलिसांकडून हातभट्टी दारू तयार व विक्री करणारांवर अनेकदा कारवाया केल्या जातात. परंतु त्यात संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला जातो. विषारी किंवा घातक पेयांची विक्री केल्याप्रकरणी बीएनएसमधील कलम 285, 120, 125, 123 नुसार गुन्हे दाखल केल्यास अधिक कडक शिक्षा दारू तयार करणाऱ्यांना व विकणाऱ्यांना लागू शकते. त्या दृष्टीने पोलिसांनी आता गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT