

शिरूर: शिरूर परिसरातील महिलांची सोनसाखळी हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या संशयिताकडून 25 ग््रॉम वजनाचे सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. 16) सकाळी बाबूरावनगर येथील ज्ञानगंगा अभ्यासिकेसमोरून पायी जात असताना राधाबाई किसन कडीले यांच्या गळ्यातील 9 ग््रॉम 570 मिलीग््रॉम वजनाची सुमारे 39 हजार 595 रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात दुचाकीस्वाराने हिसकावून नेली होती. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, शाइन मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय माहितीच्या मदतीने संशयिताची ओळख ज्ञानेश्वर वसंत काळे (रा. बाफनामळा बाबूरावनगर, शिरूर) अशी पटली.
पथकाने आरोपीचा शोध घेऊन मलठण परिसरात सापळा रचला. सोमवारी (दि. 25) त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. अधिक तपासात शिरूर व नारायणगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आणखी दोन गुन्ह्यांची उकल झाली.
पोलिसांनी आरोपीकडून 25 ग््रॉम सोन्याचे दागिने, चोरीसाठी वापरलेली शाइन मोटारसायकल असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्ञानेश्वर काळे हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.