Baramati Hailstorm Crop Damage Pudhari
पुणे

Baramati Hailstorm Crop Damage: बारामतीत वादळी पाऊस व गारपीट; शेतपिकांचे मोठे नुकसान

शिमला मिरची, टोमॅटो व केळी पिकांना फटका; शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वरनगर: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागाला रविवारी (दि. 31 मे) सायंकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार तडाखा दिला. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. यात अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस संकट घेऊन आला.

होळ येथील शेतकरी नितीन कदम यांचे बांबूशेड व त्याखालील सुमारे एक एकर शिमला मिरचीचे पीक गारपिटीमुळे उद्ध्‌‍वस्त झाले. या नुकसानीचा अंदाज सुमारे आठ लाख रुपये असून, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. तसेच, वडगाव येथील मिलिंद बोकील यांची केळीची बागही वादळी पावसामुळे जमीनदोस्त झाली.

सायंकाळी पाचच्या सुमारास आठ फाटा, दहा फाटा, वडगाव, कोऱ्हाळे आणि होळ परिसरात मुसळधार पाऊस झाला. तर मुरुम, वाणेवाडी आणि सोमेश्वर कारखाना परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मेघगर्जना, सुसाट वारे आणि गारांच्या माऱ्यामुळे अवघ्या काही मिनिटांत वातावरणात मोठा बदल झाला. यामुळे नागरिकांसह शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली.

सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या पावसामुळे रस्ते, शेतजमिनी आणि सखल भाग जलमय झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व झुडपे कोसळली, तर काही भागांतील वीजपुरवठाही विस्कळीत झाला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. टोमॅटो, शिमला मिरची तसेच वेलवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सदोबाचीवाडी येथील शेतकरी अमर होळकर, राजेंद्र गाढवे, रवींद्र गाढवे आणि सुधीर गाढवे यांनी सांगितले की, गारपिटीमुळे टोमॅटोची फळे आणि फुलकळ्या फुटून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग््रास्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT