Fake Police Pudhari
पुणे

Baramati Fake Police: ‘आम्ही पोलीस आहोत, तपासणी सुरू आहे’; बारामतीत बनावट पोलिसांकडून १.२५ लाखांचा ऐवज लंपास

गणेशोत्सवातील सुरक्षेचे कारण सांगून टी. सी. महाविद्यालयाजवळ व्यक्तीला अडवले; सोनसाखळी व अंगठी घेऊन दुचाकीवरून पोबारा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: 'आम्ही भरारी पथकातील पोलीस असून गस्त सुरू आहे,' अशी बतावणी करीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीला अडवून त्याच्याकडील सोनसाखळी व अंगठी लंपास केली. ही घटना बारामतीतील टी. सी. महाविद्यालयाजवळील जिमखाना गेट, व्हिल कॉलनीजवळ १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विकास श्रावण बगाडे (रा. शरदनगर, तांदूळवाडी रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बगाडे हे टी. सी. महाविद्यालयात ग्रंथालय परिचर आहेत. ते महाविद्यालयातून व्हिल कॉलनीच्या दिशेने जात होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना थांबविले. पुढे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले होते, तर मागे बसलेल्या व्यक्तीने चेहऱ्याला रूमाल बांधला होता.

'आम्ही भरारी पथकातील पोलीस असून, गस्त सुरू आहे. गणपती उत्सवाच्या काळात चोरी-मारी होण्याची शक्यता असल्याने तुमच्या सुरक्षिततेसाठी तपासणी करीत आहोत,' असे सांगून या दोघांनी बगाडे यांच्याकडील मौल्यवान वस्तू मागितल्या.

पोलिस असल्याचा विश्वास बसल्याने बगाडे यांनी मोबाईल, घड्याळ, महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड, तसेच गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी आणि अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी त्यांच्याकडे दिली. संशयितांनी या वस्तू रूमालात बांधून त्या बगाडे यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असल्याचे भासविले. त्यानंतर ते दुचाकीवरून वेगाने निघून गेले.

संशय आल्याने बगाडे यांनी काही अंतरावर दुचाकी थांबवून डिक्की उघडली असता मोबाईल, घड्याळ व एटीएम कार्ड मिळाले; मात्र, सोन्याची चेन व अंगठी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकारात एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT