राजेंद्र गलांडे
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीत विरोधकांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले आहे. बारामतीत त्यांच्या पॅनेलने नव्या-जुन्यांचा मेळ साधला असून, नगराध्यक्षपदी तगडा उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाने नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. परंतु, सर्व प्रभागांत उमेदवार देण्यात हा पक्ष कमी पडला. भाजप-सेनेने सध्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. परंतु, उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत भाजप-सेना एकत्र येतील, अशी दाट शक्यता बारामतीत आहे.
विष्णुपंत चौधर, सुनील सस्ते आणि जयसिंग देशमुख हे गेल्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनेलविरोधात निवडून आले होते. बारामती विकास आघाडी स्थापन करीत त्यांनी पवारांसोबत संघर्ष केला होता. या वेळी त्यांना आपल्याकडे वळवत अजित पवारांनी त्यांना आपल्या पॅनेलमध्ये घेतले आहे. देशमुख, चौधर यांनी पवार यांच्याशी जुळवून घेतले होते. परंतु, सस्ते हे विरोधात कार्यरत होते. त्यांनाही आता राष्ट्रवादीकडे वळविण्यात पवार यांना यश आले. माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांच्या भगिनीला राष्ट्रवादीने संधी देत बेरजेचे राजकारण केले आहे. गत निवडणुकीत पालिकेत असलेल्या काही कुटुंबांतील इतर सदस्यांनाही पवार यांच्या पॅनेलने आरक्षणामुळे पुन्हा उमेदवारी दिली आहे. फक्त उमेदवार बदलले गेले आहेत. अजित पवार यांनी नव्या-जुन्यांचा मेळ साधला आहे. गतवेळी पालिकेत नगरसेवक असलेल्या जय पाटील, विष्णुपंत चौधर, अभिजित जाधव, अमर धुमाळ, जयसिंग देशमुख, संजय संघवी, बिरजू मांढरे, नवनाथ बल्लाळ, सुनील सस्ते यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. यातील बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांना नगराध्यक्षपदाच्या मैदानात उतरविले आहे.
राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एकाला संधी दिली जाणार असल्याचे पक्षाकडून युगेंद्र पवार यांनी सांगितले. अन्य सुमारे 20 जागी या पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. परंतु, शहरातील सर्व 42 ठिकाणी उमेदवार त्यांना देता आलेले नाहीत. वंचित बहुजन आघाडी, कॉंग््रेास आणि अन्य समविचारींना सामावून घेत पॅनेल करण्याचा प्रयत्न या पक्षाकडून सुरू आहे.
भाजपने नगराध्यक्षपदासाठी गोविंद देवकाते यांना संधी दिली आहे. अन्य 30 जणांचे अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना (शिंदे गटा) कडून जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय सदस्यपदासाठी 12 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजप-सेनेच्या येथे वाटाघाटी सुरू आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने काही ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनाही सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. एकत्र येऊन ते आपापल्या पक्षचिन्हावर निवडणुकीला सामोरे जातील, अशी स्थिती आहे. बहुजन समाज पक्षाने काळुराम चौधरी यांना नगराध्यक्षपदाच्या आखाड्यात उतरविले आहे.
बारामती नगरपरिषदेसाठी आजच्या दिवसअखेर नगराध्क्षपदासाठी 22, तर नगरसेवकपदासाठी 298, असे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. पालिका निवडणुकीत अपक्षांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. त्यांना थोपवत रणांगणातील उमेदवारांची संख्या कमी करण्याचे आव्हान आता या तिन्ही पक्षांपुढे आहे. परंतु, राज्यात सत्तेत असलेली भाजप-सेना आणि राष्ट्रवादी बारामतीत एकत्र लढणार नाही, हे मात्र निश्चित आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीसह भाजप-सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, बहुजन समाज पक्ष हे आपापल्या चिन्हावरच निवडणुकीला सामोरे जातील, असे चित्र आहे.