

पुणे : शहरातील रस्त्यावरून धूर ओकत अनेक खासगी, सरकारी वाहने सुसाट धावताना दिसतात. तसेच, बांधकाम प्रकल्पावरील धुळीमुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे. त्याकडे शासन-प्रशासनाची उघड डोळेझाक केली जात आहे; पण वाढत्या थंडीत उब मिळवण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले तसेच निवासी परिसरांत रात्रीच्या वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या प्रदूषणात मोठी भर घालत आहेत, असा अजब दावा करत शेकोट्या पेटवाल तर दंडात्मक कारवाई होईल, असा आदेशच पुणे महापालिकेकडून जारी करण्यात आला.
महापालिकेच्या या अजब निर्णयामुळे रात्री व दिवसा उघड्यावर काम करणाऱ्यांवर थंडीत कुडकुडण्याची वेळ आली आहे. पुणे शहर गारठले आहे. शहरात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. 18) पुण्याचे किमान तापमान 9.4 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
या वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मात्र, या शेकोट्या पेटवताना लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळला जात असल्याने यामधून निर्माण होणाऱ्या धुरांमुळे शहरातील हवा प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिमाण होत असल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरात शेकोट्या पेटवण्यास बंदी घालण्याचे आदेश मंगळवारी दिले. हवा प्रदूषणामुळे केवळ वातावरणामध्ये बदल होत नाहीत, त्यामुळे याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होत आहे. शेकोट्यातून बाहेर पडणारा धूर, कार्बन मोनो-ऑक्साइड पीएम 10, पीएम 2.5 आणि अन्य हानिकारक वायूंचे उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो. ज्यामुळे दमा,
शहरातील हवा गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने हवा प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी विविध कायदे आणि नियम बनवले आहेत. या (प्रदूषण नियंत्रण) अधिनियम 1981 अंतर्गत भाग 4 कलम 19 (5), आणि ’घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 कलम 15 (छ) तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडील राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमची 25 ऑगस्ट 2022 रोजीची मार्गदर्शक तत्त्वे यानुसार उघड्यावर कोळसा / जैविक पदार्थ /प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळण्यास मनाई केली आहे.
पुणे शहरातील सोसायटीच्या परिसरात किंवा रस्त्यावर शेकोटी पेटवून उघड्यावर कोळसा / जैविक पदार्थ (बायोमास) / प्लास्टिक / रबर आणि इतर कचरा जाळून धूर निर्माण केला आणि कोणत्याही गृहनिर्माण संकुलातील वॉचमन, सफाई कामगार आणि इतर कामगार व्यक्ती, मनपा कर्मचारी किंवा कंत्राटी कामगार किंवा मनपा ठेकेदाराकडील नियुक्त कंत्राटी कामगार या नियमांचे उल्लंघन करताना आढळले तर त्यांच्यावर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.