बारामती: बारामतीच्या राजकारणात बिनविरोध नगरसेवक अशी शेखी मिरवणाऱया राष्ट्रवादीचा नगरसेवक किशोर मासाळ याच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. नगरसेवक पदाचा राजीनामा किंवा हकालपट्टी हे दोनच पर्याय पक्षाने आता त्याच्यासमोर ठेवले आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी हे पद अौटक घटकेचेच ठरण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दोन दिवस वाट बघू अन्यथा पक्षातून हकालपट्टी करू असा थेट इशाराच राष्ट्रवादीने त्याला दिला आहे.
मासाळ याच्या राजकीय ऱहासाला तो स्वतःच कारणीभूत ठरला आहे. २९ मे रोजीच त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. एका विधवा महिलेच्या अबला पणाचा फायदा घेत त्याने वेळोवेळी तिच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करत तिच्याकडे शरीरसुखाची माघणी केली होती. मी स्थानिक नेता आहे, तुला इथे सुखाने जगू देणार नाही, माझ्या खूप अोळखी आहेत, तुला नको नको करून ठेवीन, खोट्या गुन्ह्यात अडकवेन, तुझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत, तू मी सांगेल तसे एेक, बारामतीतील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकूडन मला पैसे काढून दे, नाही तर तुझे फोटो मी सोशल मिडियावर पाठवत बदनामी करीन अशी धमकी त्याने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. हे प्रकरण सध्या पोलिसांच्या तपासावर आहे.
त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वीच मासाळ याचे एक काॅल रेकाॅर्डींग व काही बारामतीत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यात एका महिलेला केलेल्या काॅलमध्ये तो दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनासंबंधी अत्यंत बेताल वक्तव्य करताना दिसत आहे. या प्रकरणातही मासाळ याने संबंधित महिला कोणत्या जातीची आहे, याचा उल्लेख करत आपल्या कृतीचे लंगडे समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हे रेकाॅर्डींग बाहेर आल्यानंतर बारामतीत संतापाची एकच लाट उसळली. अजितदादा प्रेमींनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली.
स्वतः मासाळ याने या रेकाॅर्डींगमधील आवाज माझाच असल्याची कबुली दिली होती. गेली दोन-तीन दिवस बारामतीत समाजमाध्यमांवर याचीच चर्चा होती. पक्ष संघटना त्याचा राजीनामा का घेत नाही, असाही सवाल उपस्थित केला जात होता. अखेर शनिवारी पक्षाने पत्रकार परिषद घेत आपली ठाम भूमिका जाहीर केली. त्यानंतर आता मासाळ याच्यापुढे राजीनामा देण्यावाचून पर्याय उरला नसल्याची स्थिती आहे. राजीनामा न दिल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाणार असून अन्य कायदेशीर आयुधांचाही वापर केला जाणार असल्याचे शहराध्यक्ष किरण इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवून दोनदा पालिका निवडणूकीत मासाळ याला अपय़श आले होते. पुढे त्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु पालिका निवडणूक लांबल्याने मोठी प्रतिक्षा करावी लागली. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणूकीत प्रभाग पाचमधून तो बिनविरोध निवडून आला. त्यात अजितदादांचा सिंहाचा वाटा होता. किंबहुना दादांच्या प्रयत्नातूनच ही जागा बिनविरोध झाली होती. पालिकेत नगरसेवकांनी पदभार घेतलेल्याला अजून सहा महिने लोटायचे आहेत. त्या आधीच वेगवेगळ्या कारणांनी तो अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याच्यापुढे आता राजीनामा देण्यावाचून अन्य पर्याय उरलेला नाही. त्याचे नगरसेवक पद अौटघटकेचेच ठरेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.