बारामती: शहरातील प्रगतीनगर भागातील चिंचकर चौक येथे चायनीज हॉटेलचालकाने हॉटेल सुरू ठेवण्याच्या बदल्यात हप्ता न दिल्याच्या रागातून आठ जणांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
, , , , , , , , ,
शहरात खंडणीच्या प्रकरणातून घडलेल्या या घटनेची मोठी चर्चा आहे. हॉटेलचालकाला केलेली मारहाण आणि हॉटेलची केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी जाताना गल्ल्यातील 8 हजार 300 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने नेली. शुक्रवारी (दि. 26) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी आकाश सिद्धनाथ काळे (रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्या चायनीज हॉटेलात ही घटना घडली.
याप्रकरणी हॉटेलचालक आकाश काळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनायक मारक ऊर्फ मांबरी, राहुल चव्हाण, राज गावडे, आदित्य बगाडे, निहाल जाधव व विवेक (पूर्ण नाव नाही. सर्व रा. दादा पाटीलनगर, तांदूळवाडी, बारामती) यांच्यासह दोघा अनोळखी अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
आकाश काळे हे चिंचकर चौकात आपले चायनीज या नावाचे हॉटेल चालवतात. मागील 15 दिवसांपूर्वी या आरोपींनी त्यांच्याकडे हॉटेल सुरू ठेवायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली होती. फिर्यादीने त्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून या आरोपींनी फिर्यादीच्या हॉटेलात येत त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने हल्ला केला. हॉटेलच्या गल्ल्यात हात घालून त्यातील 8 हजार 300 रुपये रोख रक्कम दहशतीने काढून घेत शस्त्रांसह दरोडा टाकला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्ह्यातील काही जण सराईत
या गुन्ह्यातील काही आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. विनायक मारक ऊर्फ मांबरी व राहुल चव्हाण या दोघांवर 2018 मध्ये खुनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. गावडे, बगाडे, जाधव यांच्या विरोधातदेखील सन 2024 मध्ये काही गुन्हे दाखल आहेत.