Online Medicine Sales Protest Pudhari
पुणे

Online Medicine Sales Protest: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बारामतीत केमिस्टांचा बंद

बनावट औषधे आणि रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; तहसील कार्यालयावर मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये बारामती तालुका केमिस्ट अँँड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग घेतला. त्यांनी बुधवारी (दि. 20) आपली दुकाने बंद ठेवली. शहरातील शारदा प्रांगणापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. तहसीलदार स्वप्निल रावडे यांना असोसिएशनकडून निवेदन देण्यात आले.

असोसिएशनचे अध्यक्ष युवराज यादव, सचिव अशोक ओसवाल, भारत मोकाशी, संदीप चोपडे, सूर्यकांत खटके यांच्यासह शहर-तालुक्यातील औषध विक्रेते या मोर्चात सहभागी झाले होते. देशात बेकायदेशीररीत्या ऑनलाइन औषध विक्री केली जात आहे. भरघोस डिस्काउंटमुळे रुग्ण ऑनलाइन औषधे खरेदी करीत असला तरी तो जिवाशी खेळ आहे. त्यामुळे हा संप पुकारल्याचे असोसिएशनने सांगितले.

या वेळी अध्यक्ष यादव म्हणाले की, असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारचा बंद यशस्वी झाला आहे. शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. सकारात्मक मार्ग निघाला नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशानुसार पुढील पाऊल उचलले जाईल. जास्तीचा कॉर्पोरेट डिस्काउंट ऑनलाइन प्रक्रियेत रुग्णांना मिळतो आहे. पण, त्यात अनेक धोके आहेत. एक्सपायरी बॅच खोडून तेथे लेबल लावून घातक औषधे विकली जातात. यासंबंधी आम्ही ‌‘एफडीए‌’ला तक्रारी दिल्या आहेत. पण, अद्याप कारवाई झालेली नाही.

भारत मोकाशी म्हणाले की, देशभरातील साडेबारा लाख विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले आहेत. आम्हाला 16 टक्के मार्जिन मिळते. कॉर्पोरेट कंपन्या 20 टक्के मार्जिन देत आहेत. त्यातून बनावट औषधांचा धोका वाढतो आहे. टर्मिनसारखी इंजेक्शन ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. गर्भपात किट ऑनलाइन मागविले जात आहे. त्यातून रुग्णाच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

स्पर्धेमध्ये नैतिकता महत्त्वाची आहे. चुकीची औषधे ऑनलाइन विकली गेली, तर रुग्णाला धोका पोहचू शकतो. गर्भपात किट डॉक्टरच्या सल्ल्यानेच दिले जाते. पण, तेच ऑनलाइन उपलब्ध असेल तर हा बेकायदेशीर भ्रूणहत्येचाच प्रकार असल्याचे ओसवाल व खटके म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT