Bhondu Baba Pudhari
पुणे

Maharashtra Fake Baba Fraud: बारामतीत भोंदूगिरीचा सुळसुळाट; देव-करणीच्या नावाखाली फसवणूक वाढली

बारामती तालुक्यात भोंदूबाबांकडून देव, करणी, पितृदोषाच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

बारामती: प्रगतशील म्हणून ओळख असलेल्या बारामती तालुक्यात सध्या भोंदुगिरीचा विळखा घट्ट होत चालल्याचे धक्कादायक चित्र आहे. देव, करणी, पितृदोष आणि वास्तुदोष यांच्या नावाखाली अनेक स्वयंघोषित बाबांनी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना उघड होत आहेत; मात्र आपले नाव बदनाम होईल, या भीतीने अनेक पीडित नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने हे प्रकार बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दोनच दिवसांपूर्वी भोंदूबाबा मनोहर भोसले याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. त्याचे अनेक अनुयायी बारामती तालुक्यात असल्याचेही तपासात पुढे आले आहे.

राज्यभरात विविध भोंदूबाबांकडून फसवणुकीची प्रकरणे समोर येत असताना बारामती तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. उलट येथे अशा स्वयंघोषित बाबांचा सुळसुळाट वाढत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी देवीची स्थापना करून देतो‌’, ‌‘संकट दूर करतो‌’ अशा आमिषांद्वारे लोकांची दिशाभूल करून मोठ्या रकमा उकळल्या जात आहेत.

विशेष म्हणजे, अनेक वेळा शिक्षित आणि सुजाण नागरिकही या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. सामाजिक दबाव, लाज आणि भीतीमुळे ते पुढे येत नसल्याने पोलिसांकडे अधिकृत तक्रारींचा आकडा कमी असला, तरी प्रत्यक्षात फसवणुकीचे प्रमाण मोठे आहे.

दरम्यान, नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावे, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि फसवणूक झाल्यास तत्काळ तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. समाजात जागृती निर्माण करणे आणि भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT