Bhigwan Kidnaping Case Pudhari
पुणे

Bhigwan Kidnaping Case: भिगवण अपहरण प्रकरणाला कलाटणी; तरुणीचा न्यायालयात जबाब, कुटुंबासोबत जाण्यास नकार

बारामतीत कलम 164 अंतर्गत इनकॅमेरा जबाब; अपहरणाचा आरोप फेटाळत प्रेमसंबंध मान्य, न्यायालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

बारामती: भिगवण (ता. इंदापूर) येथील 21 वर्षीय अपहृत तरुणी शुक्रवारी (दि. 20) पहाटे दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली. सध्या ती शहर पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचा जबाब पोलिसांकडून नोंदविला गेला. शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तिला बारामती न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयात तिचा इनकॅमेरा जबाब नोंदविला गेला. तब्बल दीड तासाने ती न्यायदान कक्षातून बाहेर पडली. या वेळी बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात व बाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल हे शुक्रवारी बारामतीत दाखल झाले.

भिगवण भागातील एका मुलीचे भरदिवसा तिच्या आई व भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून दोघा सख्ख्या भावांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि. 17) घडली होती. या प्रकरणात जहीर शेख व आयान शेख या दोघा भावांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे भिगवणमधील वातावरण कमालीचे चिघळले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंद ठेवले होते.

दरम्यान, या तरुणीचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेला अचानक कलाटणी मिळाली. या व्हिडीओमध्ये तिने मी स्वतःहून संबंधित तरुणासोबत आल्याचे सांगत माझे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. माझे प्रेमसंबंध असल्याचेही सांगितले होते. तरीही आक्रमक संघटनांनी ती त्यांच्या दबावापोटी व्हिडीओद्वारे असे बोलत आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत हजर करा, अशी आग््राही मागणी पोलिसांकडे केली होती. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता. घटनेनंतर हे जोडपे अहिल्यानगर, पुणे, सासवड, वाठारमार्गे महाबळेश्वरला गेले होते. तेथून ते बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले.

शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथील जिल्हा सत्र न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. देशमुख यांच्यासमोर तिचा कलम 164 अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला. या वेळी न्यायदान कक्षाबाहेर अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्यासह बारामती शहर, तालुका, माळेगाव, भिगवण, इंदापूर, यवत, दौंड येथील पोलिस निरीक्षक आणि विविध पोलिस ठाण्यांतील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

मुलगी दबावाखाली; तक्रारीवर आई ठाम

दरम्यान, माध्यमांशी बोलताना तरुणीच्या आईने सांगितले की, माझ्या पतीचे कोविडमध्ये निधन झाले. त्याचा गैरफायदा या लोकांनी घेतला. गेल्या 12 वर्षांपासून माझी मुलगी दबावाखाली आहे. मुलगी जर त्यांच्यासोबत गेली, तर आम्ही इथेच आत्महत्या करू. पोलिस आम्हाला सहकार्य करीत नाहीत. कोणताही राजकीय नेता, मंत्री आम्हाला सहकार्य करीत नाही. आम्ही पोलिस ठाण्यात गेलो तर पोलिस म्हणाले की, मुलीला न्यायालयात घेऊन जाणार आहे, तिथे या. इथे मुलगी म्हणते की, मला आईबरोबर जायचे नाही. घटनेदिवशी आमच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली होती. दांडके काढून आम्हाला मारहाण झाली आहे. मुलीला उचलून गाडीत टाकून नेले. या वेळी मी ओरडत असताना कोणी तेथे आले नाही. तिचा भाऊ लहान असल्याने मुलीला ब्लॅकमेल करीत आहेत. मुलगी दबावाखाली बोलत असून, आमच्याकडे पाहायलासुद्धा नकार देत आहे. मी माझ्या तक्रारीवर ठाम असून, मुलगी पोलिसांसमोर खोटे बोलत आहे. ती 12 वर्षांची असल्यापासून आरोपी ब्लॅकमेल करीत आहेत. ती आता 21 वर्षांची झाल्यावर तिच्यासोबत हा प्रकार केला गेला.

तरुणीने अपहरणाचा आरोप फेटाळला

दरम्यान, या घटनेसंबंधी तरुणीने माध्यमांना सांगितले की, माझे जहीर याच्याशी गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध आहेत. याची कल्पना मी आई व दोन्ही भावंडांना दिली होती. आम्ही लग्न करणार असल्याचे मी सांगितले होते. परंतु, या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध रावणगाव (ता. दौंड) येथे माझा दि. 22 फेबुवारी रोजी विवाह निश्चित केला. दि. 17 रोजी मी माझ्या भावाच्या फोनवरून जहीरशी संपर्क साधला. घटनेदिवशी आम्ही बाजारपेठेत खरेदीसाठी गेलो होतो. सोबत माझी आई व भाऊ होते. जहीर या वेळी आनंद हॉटेलच्या पाठीमागे गेस्ट हाऊसजवळ थांबला होता.

मी कुटुंबीयांची नजर चुकवून त्याच्यासोबत माझ्या मर्जीने तेथून गेले. पुढे आम्ही नगरच्या दिशेने गेलो. तेथून हडपसर येथे व त्यानंतर तेथून सासवडमार्गे वाठार (जि. सातारा) येथे गेलो. बातम्यांतून मला भिगवणमध्ये घडलेला प्रकार समजला. त्यानंतर मी एक व्हिडीओ प्रसारित केला. तो व्हिडीओ माझाच असून, तो कोणाच्याही दबावाखाली मी तयार केलेला नाही. अपहरण, मारहाण आणि सोने हिसकावून नेल्याची माझ्या घरच्यांनी केलेली तक्रार खोटी आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही दोघांनी पुढे एकत्रित वाटचाल करायचे ठरविले आहे. तरुणीने पोलिसांकडे शपथपत्र सादर करीत अपहरणाचा आरोप फेटाळला.

न्यायालयात मोठा बंदोबस्त

सुमारे सव्वा तास ही तरुणी न्यायदान कक्षात होती. या वेळी पोलिसांनी या कक्षाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. न्यायालयात व बाहेरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इनकॅमेरा तिचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर ती दीडच्या सुमारास पोलिस संरक्षणात न्यायालयातून बाहेर पडली. या मुलीची आई, भाऊ व अन्य नातेवाईक न्यायालयात तसेच न्यायालयाबाहेर थांबले होते. परंतु, तरुणीने कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे तिला पोलिस बंदोबस्तात थेट शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या वेळी तिच्या आईने व नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. दरम्यान, संबंधित तरुणाबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. शहर पोलिस ठाण्यात हे दोघे हजर झाले होते. परंतु, त्यानंतर पोलिसांकडून या तरुणाला तेथून हलविण्यात आले.

‌‘त्या‌’ तरुणीचा कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार

भिगवण येथील अपहरण प्रकरणातील तरुणी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर तिचे आई-भावासोबत संभाषण झालेले आहे. मात्र, तरुणीने कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिला, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT