काटेवाडी: बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील प्रगतशील शेतकरी किशोर मोहन भापकर यांनी केळीशेतीतून गावचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांनी उत्पादित केलेली केली इराणला निर्यात करण्यात आली आहेत. या प्रयोगात त्यांना पत्नीची खंबीर साथ मिळाली.
भापकर दाम्पत्यांनी पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले. त्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात जी-9 (ग््राँड नाइन) जातीच्या केळीची लागवड केली आहे. यातून 10 टनांहून अधिक निर्यातक्षम केळीची पहिली गाडी थेट इराण देशात रवाना झाली आहे. ढेकळवाडी गावातून मोठ्या प्रमाणावर केळीची परदेशी निर्यात होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
किशोर भापकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर शेती हाच व्यवसाय पूर्णवेळ स्वीकारला आहे. आधुनिक व निर्यातक्षम शेतीकडे वाटचाल करताना त्यांना पत्नी मीना भापकर यांची मोलाची साथ लाभली. मीना भापकर ह्या स्वतः शेतीतील नवनवीन उपक्रम राबवतात. केळी लागवड, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, रोगनियंत्रण तसेच बाजारपेठेची माहिती, यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करताना भापकर दाम्पत्याने जी-9 जातीची केळी लागवड करताना टिश्यू कल्चर रोपे, ठिबक सिंचनव्यवस्था, संतुलित अन्नद्रव्य व खतव्यवस्थापन, रोग व किडींसाठी शास्त्रीय उपाययोजना, या आधुनिक पद्धतींचा अवलंब केला. लागवडीपूर्वी मातीपरीक्षण, योग्य अंतर पद्धत आणि नियोजनबद्ध पाणीव्यवस्थापन, यामुळे केळीचे घड आकाराने एकसमान, वजनदार व दर्जेदार तयार झाले. परिणामी, केळीचा टिकाऊपणा व गुणवत्ता वाढली आणि परदेशी बाजारपेठेत मागणी निर्माण झाली. काढणी योग्य परिपक्वतेच्या टप्प्यावर करण्यात आली. त्यानंतर केळीचे घड स्वच्छ करून आंतरराष्ट्रीय निकषांनुसार ग््रेाडिंग व बॉक्स पॅकिंग करण्यात आले. सुमारे 10 टनांपेक्षा अधिक केळीची पहिली खेप इराणसाठी रवाना झाली.
या यशस्वी उपक्रमाची दखल घेत तालुक्यातील कृषी अधिकारी व उपक्रमशील प्रगत शेतकऱ्यांनी केळीबागेला भेट देऊन किशोर भापकर यांचे कौतुक केले. पारंपरिक पिकांसोबत फळपिकांची जोड दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या यशस्वी केळी निर्यातीमुळे किशोर भापकर यांची शेती केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता जागतिक बाजारपेठेशी जोडली गेली आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, सातत्यपूर्ण मेहनत आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर शेतीतून शाश्वत व भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे भापकर दाम्पत्याने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.