

पुणे: नागरी सहकारी बँकांचे मूल्यांकन करताना ते केवळ आकडेवारीत करणे योग्य नाही. सहकारात बँकेचे मूल्यांकन हे सामाजिक कामात देखील करायला हवे, अशी अपेक्षा राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्थांचे निबंधक दीपक तावरे यांनी येथे व्यक्त केली. सुरुवातीला पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची ओळख ही रिक्षावाल्यांची बँक अशी होती. आजही विविध कार्यांद्वारे पुणे पीपल्स बँकेचा सामाजिक दृष्टिकोन इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.
पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक ही अमृत महोत्सवी वर्षात (75) पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शुक्रवारी (दि. 23) आयोजित विशेष कार्यक्रमात अमृत महोत्सवानिमित्त बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सरव्यवस्थापक संजयकुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक व ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश ढमढेरे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, सहकारी संस्थांचे पुणे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्यासह पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, संचालक सीए जनार्दन रणदिवे यांच्यासह बँकेचे अन्य संचालक आदी उपस्थित होते.
मनोरुग्ण महिलांसाठी अजोड कार्य करणार्या अहिल्यानगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना पुणे पीपल्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये एक लाख एक हजाराचा धनादेश, पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. पराग काळकर म्हणाले, जीवनात जे जे मिळेल ते समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. डॉ. धामणे दांपत्याने हे प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. बँकेने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड म्हणाले, मार्च 2026 अखेर किमान 500 कोटी रुपये व्यवसायवाढीचे उद्दिष्ट असून, मार्च 2027 पर्यंत व्यवसायाचे चार हजार कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बँकेचे व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांनी मार्गदर्शन केले.