

माळेगाव: माळेगाव नगरपंचायतीच्या विकास आराखड्यामुळे जवळपास चारशे हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. यामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शहरातील अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ येणार आहे. प्रशासन जनतेच्या मुळावर उठल्याची टीका नागरिक करीत आहेत. शेतकरी आणि नागरिकांमधून या आराखड्यातील आरक्षणाबाबत तीव संताप व्यक्त होत आहे.
माळेगाव नगरपंचायतीवर गेली पाच वर्षे प्रशासक होते. यादरम्यानच्या काळात माळेगावसाठी विकास आराखडा बनविण्याचे काम बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार अधिकारी दत्तात्रय शंकरराव तरोडे यांच्याकडे सोपविण्यात आले होते. माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर शहराच्या विकासासाठी 61 जागांवर आरक्षण टाकल्याचे जाहीर करण्यात आले. शहराचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, तो नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर लावण्यात आला आहे. त्यात गरज नसताना 30, 40, 50 व 100 फुटांचे रस्ते टाकल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने माळेगावातील शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. माळेगावच्या चारही बाजूंनी बाह्य रस्ते टाकल्यामुळे चारशे हेक्टर क्षेत्र बाधित होत असून, पाण्याचे स्रोत असलेल्या 49 विहिरी नष्ट होणार आहेत. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. जमिनीच्या विभाजनामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे, निरा-बारामती मार्ग आठपदरी करून सेवा रस्ता काढल्यास रिंगरोडची काय आवश्यकता आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तसेच, बहुतांश ठिकाणी 40-50 पेक्षा जास्त फुटांचे रस्ते टाकले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे बेघर होणार आहेत. दरम्यान, शहराचा नियोजित आराखडा बनविताना कमीत बाधित संख्या असणे आवश्यक आहे. मात्र, यामध्ये शेकडो नागरिक बाधित झाले आहेत. या अन्यायाविरुद्ध माळेगाव बचाव कृती समिती बाधित नागरिकांची बैठक घेण्यात आली. त्यात नागरिकांनी तीव प्रतिक्रिया व्यक्त केली.
हरकतींसाठी 17 फेबुवारीपर्यंत मुदत
माळेगाव नगरपंचायत प्रशासनाने तयार केलेला नियोजित आराखडा हा प्रारूप असून, यासाठी बाधित नागरिक व शेतकऱ्यांना येत्या 17 फेबुवारीपर्यंत आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष सुयोग सातपुते व मुख्य अधिकारी बालाजी लोंढे यांनी दिली.
मी अल्पभूधारक शेतकरी आहे. गट नंबर 507 मधून रस्ता गेल्याने आमचे उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीपेक्षा ग््राामपंचायत बरी, असे म्हण्याची वेळ आली आहे.
जयश्री चंद्रकांत धंगेकर
माळेगावातील गट नंबर 652 या अर्ध्या एकरातून रस्ता झाल्यास विहीर नष्ट होऊन जमिनीचे तुकडे पडणार आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय संपुष्टात येणार आहे.
सदाशिव बाबासो जाधव