बाणेर: पुणे महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकांची घोषणा झाली असून, ही निवडणूक केवळ प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नसून शहर व परिसराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या बाणेर, बालेवाडी, सूस महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी (प्रभाग क्र. 9) परिसरात नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक मूलभूत प्रश्न आज अधिक तीवतेने समोर येत आहेत.
पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रस्ते व पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि हरित क्षेत्रांचे संवर्धन यासोबतच वाढते वायू, ध्वनी व बांधकामजन्य प्रदूषण, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि एकूणच जीवनमान या मुद्द्यांकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. आज ठरवली जाणारी प्राधान्यक्रमे, अपेक्षा आणि धोरणच या संपूर्ण परिसराचे उद्याचे स्वरूप निश्चित करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्स असोसिएशन (बीबीपीआरए) आणि बाणेर बालेवाडी नागरिक मंच (बीबीएनएम) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग 9मधील नागरिकांच्या सहभागातून ‘नागरिकांचा जाहीरनामा‘ तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. हा जाहीरनामा कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून, पूर्णतः नागरिककेंद्रित असेल. सामान्य नागरिकांचे अनुभव, समस्या, गरजा, उपाययोजना आणि भविष्यासाठीची दृष्टी यांचा समावेश यात करण्यात येणार आहे. पुढील काळात निवडणूक लढवणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसमोर नागरिकांच्या अपेक्षा स्पष्टपणे मांडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे या संघटनेकडून सांगण्यात येत आहे.
या प्रक्रियेत बाणेर बालेवाडी, सूस, महाळुंगे, पाषाण आणि सुतारवाडी येथील अधिकाधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, आपले प्रश्न, सूचना आणि दृष्टिकोन मोकळेपणाने गुगल फॉर्म (Google Form) तसेच इ-मेलच्या माध्यमातून मांडावेत, असे आवाहन बीबीएनएम आणि बीबीपीआरए या आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी नागरिकांच्या गटांशी संवाद साधण्याचे देखील प्रयोजन केले आहे. व्यापक सहभागातून तयार होणारा जाहीरनामा हा प्रभाग 9 च्या शाश्वत, समतोल आणि नागरिकाभिमुख विकासासाठी एक ठोस मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Google Form Link:
उमेदवारांची होणार परीक्षा
सध्या प्रत्येक उमेदवार प्रचार, गाठीभेटी, तिकीट, भविष्यातील योजना, केलेली कामे मांडण्यात व्यस्त आहे. त्यातच आता प्रभाग नऊमध्ये मत देण्याआधी, मत मांडा ‘ हा अभिनव उपक्रम संस्थांकडून राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग 9 मध्ये या संघटनेच्या मांडलेल्या मतांवर उमेदवारांना ठोस उपाययोजना घेऊन नागरिकांच्या संवाद सभेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीआधी नागरिकांनी एक प्रकारची उमेदवारांची परीक्षाच घ्यायची ठरवले असल्याचे लक्षात येत आहे.