Baner Balewadi Pudhari
पुणे

Baner Balewadi: बाणेर-बालेवाडीत तरुणीच्या मृत्यूप्रकरणी पारदर्शक तपासाची मागणी; नागरिकांचा शांततापूर्ण मोर्चा

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; तपासाबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्याची सामाजिक संघटनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बाणेर : बालेवाडी परिसरात 27 जानेवारी 2026 रोजी दुर्गा चौधरी (वय 20) तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण बाणेर- बालेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बाणेर- बालेवाडी परिसरातील जवळपास 15 ते 16 सामाजिक संघटनांच्या वतीने बाणेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी चाकणकर मळ्यापासून ते बाणेर पोलिस स्टेशनपर्यंत विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येऊन शांततापूर्ण मोर्चा काढला. या प्रकरणाच्या तपासाबाबत अधिकृत माहिती नागरिकांसमोर मांडण्याची मागणी केली आहे.

बाणेर- बालेवाडी नागरिक मंचाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित तरुणी ज्या नातेवाइकासोबत राहत होती, त्या व्यक्तीकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या तरुणीच्या बहिणीचा पाच वर्षांपूर्वी असाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याचे लक्षात येत आहे. सदर व्यक्ती चुनीलाल चौधरी ही बालेवाडीतील चाकणकर मळा परिसरात “ॐ साई मेडिकल” नावाचे औषध दुकान चालवत असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणातील सत्य समोर येणे, दोषी व्यक्तींची ओळख पटणे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई होणे, हे समाजातील विश्वास टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नागरिक मंचाचे म्हणणे आहे. त्यामुळे तपास कोणत्या टप्प्यावर आहे, कोणाची चौकशी केली आहे आणि कोणती कारवाई केली आहे किंवा करण्यात येत आहे, याबाबत पोलिस प्रशासनाने अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, अशी विनंती केली आहे.

बाणेर-बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर काम, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने महिला व तरुणी वास्तव्यास येत असल्याने महिलांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. अशा घटनांबाबत पारदर्शकता ठेवणे हे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्याचे नागरिक मंचाने म्हटले आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेईल आणि योग्य ती माहिती नागरिकांसमोर मांडेल, अशी अपेक्षा बाणेर-बालेवाडी नागरिक मंच, बाणेर-बालेवाडी पाषाण रेसिडेन्सी असोसिएशन, सांस्कृतिक प्रांगण, पुणे महिला मंडळ, अखिल भारतीय सारवी महासभा, वामा वूमन्स क्लब, स्त्री फाउंडेशन पुणे, राजाभाऊ गदादे फाउंडेशन, जिओ फाउंडेशन , बालेवाडी वूमन्स क्लब आदी संघटनांनी व्यक्त केली आहे.

सदर घटना ही 27 जानेवारी रोजी घडली असून, याबाबत तरुणींच्या नातेवाइकांनी गुन्हा दाखल केलेला नाही. सदर तरुणीची मेडिकल तपासणी केली असता, त्यामध्येही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे ससून रुग्णालयाने वैद्यकीय अहवाल दिला आहे. या तरुणीचा अधिक तपासासाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे. नातेवाइकांकडून गुन्हा दाखल करून स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हा तपास करू.
चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक, बाणेर पोलिस स्टेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT