

पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. कोंढवा, मुंढवा, आंबेगाव भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून 51 लाख रुपयांचा ऐवज लांबविला. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा 24 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार गोकुळनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी 2 फेबुवारी रोजी भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड, दागिने असा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.
मुंढव्यातील श्री गजानन महाराज सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख 15 हजारांची रोकड, दागिने असा 22 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 5 फेबुवारी रोजी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.
कोंढव्यातील काकडे वस्ती भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 50 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 87 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी (7 फेबुवारी) घडली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.