प्रभाग क्रमांक 9 सूस-बाणेर-पाषण
मोहसीन शेख
स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करूनही बाणेर-बालेवाडी भागातील अनेक समस्या कायम आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुविधांपेक्षा नागरिकांच्या समस्यांचे पारडेच जड दिसून येत आहे. गेल्या काळात समस्या सोडविण्याचे प्रयत्न आम्ही पुरेपूर केल्याचे माजी लोकप्रतिनिधी सांगत असले, तरी प्रत्यक्षात नागरिक समस्यांचा पाढा वाचत आहेत. चार लोकप्रतिनिधींच्या प्रभागपद्धतीमुळे समस्यांबाबत नागरिकांचा फुटबॉल झाला. ‘हे काम माझ्याकडे येत नाही, ते दुसऱ्या लोकप्रतिनिधींचे आहे,’ अशी उत्तरेही लोकप्रतिनिधींकडून मिळाल्याचे नागरिक सांगत आहेत.(Latest Pune News)
प्रभागात 2017 मध्ये बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी या भागांचा समावेश होता. त्यावेळी बाबूराव चांदेरे, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर आणि स्वप्नाली सायकर हे चार लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिले होते. हे सर्व प्रतिनिधी बाणेर, बालेवाडी भागातील असल्याने पाषाण, सुतारवाडीकडे दुर्लक्ष झाल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कमी फरकाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी तर काही वर्षे या प्रभागाकडे लक्ष दिले नाही. तसेच, इतर प्रतिनिधींकडून आपली कामे करून घ्या, असेही सल्ले देण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत. गेल्या काळात समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना लोकप्रतिनिधींकडे हेलपाट मारावे लागत होते. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यावर जनसंपर्क कार्यालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासह त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर दिला. गेल्या टर्ममध्ये नागरिक आणि लोकप्रतिनिधींना कोरोनासारख्या भयानक संकटाचा सामना करावा लागला. या कठीण काळात सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या पद्धतीने जमेल तसे लोकांना सहकार्य केले. त्यानंतर या लोकप्रतिनिधींचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर प्रभागातील विविध विकासकामांत दिरंगाई झाल्याचे चित्र दिसून आले.
प्रशासकराजच्या कालावधीत लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्यामुळे अनेक कामे अद्यापही प्रलंबित असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या या प्रभागातील रखडलेली विकासकामे तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेवक प्रयत्न करीत आहेत. वर्षानुवर्षे रखडलेल्या विकासकामांसाठी माजी लोकप्रतिनिधी पाठपुरावाही करीत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामांचे श्रेयही घेतले जात आहे.
भाजपने ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून कुठे विकास केला, हे लक्षात येत नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत केलेल्या विविध प्रकल्पांचा सध्या बोजबारा उडाला आहे. काही प्रकल्प वापराविना धूळ खात पडले आहेत. तसेच, इतर प्रकल्पांचीही दुरवस्था झाल्याने देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
या प्रभागामध्ये खूप काही कामे करता आली असती. परंतु, प्रशासकीय विभागाच्या समन्वयाच्या अभावामुळे प्रभागात पाहिजे तसा विकास झालेला नाही. महापालिका, स्मार्ट सिटी, पीएमआरडीए, मेट्रो यांच्या समन्वयात अभाव दिसून येत आहे. निर्णय प्रक्रियेत लोकांना सामावून घेणे आवश्यक आहे. अनेक प्रकल्प ’स्मार्ट सिटी’अंतर्गत करण्यात आले असले, तरी महापालिका प्रशासन मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे.अमेय जगताप, रहिवासी
पाषाण-सूस रस्ता येथील शिवशक्ती चौक ते सुतारवाडी, पाषाण-सूस रोड ते बाणेर-पाषाण लिंक रोड आणि इतर काही डीपी रस्ते गेल्या 8 वर्षांपासून पूर्ण झालेले नाहीत. ठिकठिकाणी पदपथ, रस्ते पूर्ण न केल्याने अथवा चुकीचे झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबत आहे. ॲमेनिटी स्पेस विकसित केल्या नाहीत. या भागात वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत विकासाचे नियोजन व्हायला हवे.पुष्कर कुलकर्णी, रहिवासी
भाजपने प्रभागातील जवळपास 80 टक्के पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. अनेक डीपी रस्ते पूर्ण केले आहेत. बालेवाडी-वाकडला जोडणाऱ्या रस्त्याचे काम 10 टक्के भूसंपादन झाले नसल्याने अपूर्ण राहिले आहे. ते मार्गी लागण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. सध्या प्रभागातील विविध विकासकामे प्रशासकीय यंत्रणेमुळे रखडली आहेत. आगामी काळात ही कामे सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.अमोल बालवडकर, माजी नगरसेवक
मी सातत्याने काम करीत असतो, निवडणूक आहेत की नाही, हे पाहून काम करीत नाही, त्यामुळे प्रभागातील नागरिक माझ्याकडे सातत्याने काम घेऊन येत असतात. मी प्रामुख्याने सूस-म्हाळुंगे, रस्ते, ड्रेनेज, स्मशानभूमी रोड, 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेतील पहिले काम सूस, बावधन या दोन गावांमध्ये सुरू झाले आहे. बाणेर-बालेवाडी भागात ननावरे चौकात रस्ता खुला केला, अशी अनेक कामे आहेत.बाबूराव चांदेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष
कोरोना कालावधीतील दोन वर्षे आणि गेली तीन वर्षे महापालिकेत प्रशासकराज असल्याने वाढत्या नागरीकरणाबाबत ठोस पावले उचलता आली नाहीत. त्याचा त्रास प्रभागातील नागरिकांना होत आहे. प्रभागातील समस्या मांडण्यासाठी महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामे मागे पडली आहेत. सध्या आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून आम्ही रखडलेली कामे पूर्ण करून घेण्याचे काम करीत आहोत.स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका
महापालिकेकडून निधी मंजूर करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला. कोरानामुळे दोन वर्षे विकासकामे करता आली नाहीत. स्मार्ट सिटी माध्यमातून बाणेर, बालेवाडी परिसरात 16 प्रकल्प पूर्ण केले. परंतु, त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत धोरण न ठरल्याने या प्रकल्पांचे उद्घाटनच करता आले नाही. आगामी काळात हे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ज्योती कळमकर, माजी नगरसेविका
मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे
‘स्मार्ट सिटी’तील विविध प्रकल्प
बाणेर येथे जलतरण तलाव
सूस खिंड येथे महामार्गावरील पूल
बाणेर येथे अग्निशमन केंद्र सुरू
राम नदीतील जुनी ड्रेनेजलाइन बदलली
बाणेर येथे सोपानराव सायकर उद्यान आणि
ह.भ.प. बाळकृष्ण तापकीर उद्यान
बाणेर येथे पीएमपीचा इलेक्ट्रिक बसडेपो
बालेवाडीतील ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत
16 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते
बालेवाडी येथे साकारली आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरी, सूस-म्हाळुंगेसाठी पाणी योजना
दररोज होणार वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास
अनेक रस्त्यांना अद्यापही पावसाळी वाहिन्या नाहीत
वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत
अपुऱ्या ड्रेनेजलाइन
अपूर्ण रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत भर
बिटवाईस चौकात कायम रस्त्यावर वाहणारे सांडपाणी
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत भाजी मंडई
रखडलेली विकासकामे
मिसिंग लिंकमध्ये बालेवाडी-वाकड
रस्ता अपूर्ण
बाणेर-पाषाण लिंक रोडचे कामही रखडले
नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचा धोका व पर्यावरणाची हानी.
बाणेर, पाषाण, बालेवाडी येथे बांधून तयार असलेल्या भाजी मंडई वर्षानुवर्षे पडून
सुतारवाडी येथील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण
सूस खिंडीतील पुलावरून महामार्गाकडे जाणारे रस्ते अपूर्ण
म्हाळुंगेतील रखडलेली
टीपी स्कीम योजना