गणेश खळदकर
पुणे: विद्यार्थ्यांना कुटुंब म्हणजे काय ते सांगायचे त्यानंतर त्यांना भारतीय परंपरा, संस्कृतीची ओळख करून द्यायची आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची बीजे रोवायची. त्याचबरोबर त्यांना जलसाक्षरता, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे अशाप्रकारे समाजभान जपणारे विद्यार्थी घडवायचे, या उद्देशानेच इयत्ता तिसरीच्या आपल्या सभोवतालचे जग भाग दोन पुस्तकाची निर्मिती बालभारतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा नवीन पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात ही नवीन पुस्तके पडणार आहेत. तिसरीच्या 'आपल्या सभोवतालचे जग- भाग दोन' पाठ्यपुस्तकात एकूण १३ प्रकरणे असून, कथा आणि चित्रकथांचा समावेश आहे. हे पाठ्यपुस्तक तिसरीच्या एकात्मिक पाठ्यपुस्तक मालिकेचा दुसरा भाग असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपासच्या जगाची ओळख करून पर्यावरण, समाजजीवन, आरोग्य, विज्ञान आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विषयांची ओळख करून देण्यात येणार आहे.
पाठ्यपुस्तकातील आपले कुटुंब, कुटुंब वंशावळ, दळणवळण, जलसाक्षरता, पर्यावरण रक्षण माझी जबाबदारी, राष्ट्रीय एकात्मता, भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक विविधता आदी महत्त्वाच्या प्रकरणांमधून विद्यार्थ्यांना आपल्या घरातील आणि परिसरातील माणसे, त्यांची कामे, सार्वजनिक ठिकाणे, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणी, वनस्पती, प्राणी आणि पर्यावरण यांची माहिती देण्यात आली आहे. मुलांना निरीक्षण, चर्चा, प्रश्न विचारणे आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्यास प्रोत्साहन देणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पाठांबरोबर विविध उपक्रम, चित्रे, खेळ, प्रयोग आणि प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
या पुस्तकात आरोग्यदायी सवयी, स्वच्छतेचे महत्त्व, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांवर विशेष भर दिला आहे. मुलांना झाडे लावणे, पाण्याची बचत करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि निसर्गाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
तसेच, विविध व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती, त्यांचे समाजातील योगदान, स्थानिक प्रशासन, बाजारपेठ, वाहतूक साधने आणि संवादाची साधने यांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली आहे. तसेच, महापुरुष आणि ऐतिहासिक ठेव्यांबद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक गोष्टी समजण्यास मदत होणार आहे.